फोनवर बोलायला रोखले, पत्नीने सासरच्यांना चोपले, रबाळेतली घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: June 9, 2023 10:08 PM2023-06-09T22:08:34+5:302023-06-09T22:08:40+5:30
चर्चेसाठी भेटायला बोलावून केली मारहाण.
नवी मुंबई : एका व्यक्तीसोबत फोनवर सतत बोलण्यापासून पतीने रोखल्याने पत्नीने पतीसह सासरच्यांना भेटीसाठी बोलावून चोपल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रबाळे परिसरात राहणाऱ्या पतीसोबत हा प्रकार घडला आहे. त्याची पत्नी एका व्यतिसोबत सातत्याने फोनवर बोलत असायची. यामुळे पतीकडून आक्षेप घेत तिला फोनवर न बोलण्याची समज देण्यात आली होती. यानंतरही पत्नी त्या व्यक्तीसोबत फोनवर बोलतच असल्याने दोघांमध्ये झालेल्या भांडणातून पतीने पत्नीला मुंबईतल्या माहेरी सोडले होते.
त्यानंतरही फोनवर पती पत्नीत वाद सुरूच होता. यावरून बुधवारी दुपारी पत्नीने पतीसह सासरच्या व्यक्तींना चर्चेच्या बहाण्याने ऐरोलीत बोलवले. त्याठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला असता अगोदरच तयारीत बसलेल्या पत्नीसोबतच्या व्यक्तींनी तिचा पती व त्याच्या वडिलांना लाथा बुक्यांसह रॉडने मारहाण करून पळ काढला. यामध्ये जखमी झालेल्या पती व त्याच्या वडिलांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर गुरुवारी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पत्नी व तिच्यासोबतच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.