लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सोमवारी सकाळपासून घामाच्या धारांनी नवी मुंबईकर चांगलेच हैराण झालेले असताना दुपारनंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहरवासीयांची चांगलीच दैना उडाली. या पावसासोबत धुळीचे वादळ आल्याने संपूर्ण शहर धुळीने झाकोळले गेले हाेते. तर ३६ हून अधिक ठिकाणी वृक्ष कोलमडून पडल्याच्या वा फांद्या पडल्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी बॅरिकेड्स उडून रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी चार वाजता वादळी वातावरण निर्माण झाले. हे वादळी वारे पालघर, डहाणू येथून सुरू होऊन भिवंडी, कल्याण, बदलापूर मार्गे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येऊन धडकले. ताशी १०७ कि.मी. इतका वाऱ्याचा वेग होता. या वादळासोबत अवकाळी पाऊसदेखील सुरू झाला. शहरातील ठाणे-बेलापूर रस्त्यासह सायन-पनवेल महामार्गावर रस्ते आणि पूल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स उडून रस्त्यावर आले होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन ते हटविले.
यादरम्यान ऐरोली-मुलुंड मार्गावर महावितरणची उच्चदाब वीजवाहिनी खाली असल्याने मोठा अडथळा निर्माण होऊन मुंबईहून नवी मुंबईसह कल्याण-डोंबविली, पुणेकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. ही वीज वाहिनी पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.वाशी-कोपरखैरणे मार्गावर ठिकाणी रस्त्याचे काम महापालिकेकडून सुरू असून येथे लावलेले सूचना फलकही हवेच्या वेगामुळे कोसळले होते.
पनवेल-उरण परिसरातही पावसाने जोरात हजेरी लावल्याने नवी मुंबईकरांप्रमाणे तेथील रहिवाशांची त्रेधातिपीट उडाली. विशेषत: मुंबई-गोवा मार्ग आणि जेएनपीएकडे जाणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला. त्यामुळे कोंडी निर्माण झाली होती.