महापालिका संग्राम :राष्ट्रवादीची तीन तिघाडी अन् काम बिघाडी सारखी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 09:26 PM2023-04-14T21:26:15+5:302023-04-14T21:27:06+5:30
...आता तर शहरांत पक्षाचे तीन नेते आहेत; परंतु एकाकडे गेले, तर दुसऱ्याला राग, प्रादेशिक अस्मिता यात कार्यकर्ते गुरफटले असून, तिन तिघाडे अन् काम बिघाडे, अशी राष्ट्रवादीची अवस्था पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई : एकेकाळी नवी मुंबई म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पक्षाची महापालिकेवर १५ वर्षांहून अधिक काळ एकहाती सत्ता; परंतु त्याकाळी सत्तेचा रिमोट कंंट्रोल सध्याचे भाजपचे नेते गणेश नाईक यांच्याकडे होता. नाईक सांगतील तीच पूर्व दिशा इतके स्वातंत्र्य पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाईक यांना दिले होते. यामुळे अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांनाही शहरात काही हवे असेल, तर नाईकांना विचारावे लागत होते; परंतु राज्यातील सत्ताबदलानंतर नाईकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. तेव्हापासून मतदार असूनही पक्षाची शहरातील ताकद क्षीण झाली आहे. आता तर शहरांत पक्षाचे तीन नेते आहेत; परंतु एकाकडे गेले, तर दुसऱ्याला राग, प्रादेशिक अस्मिता यात कार्यकर्ते गुरफटले असून, तिन तिघाडे अन् काम बिघाडे, अशी राष्ट्रवादीची अवस्था पाहायला मिळत आहे.
नाईकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी मूळचे जुन्नर- आंबेगावचे असलेले दिलीप वळसे पाटील यांचे समर्थक भाजी व्यापारी अशोक गावडे यांच्यावर सोपविली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बेलापूरमधून निवडणूक लढविली. ऐरोलीतही पक्षाने बऱ्यापैकी मते घेतली. यानंतर अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी सुरुवातीला नवी मुंबईतील कार्यकर्त्यंचा हुरूप वाढविला. आव्हाड यांच्या मदतीला उरणचे प्रशांत पाटील यांनाही निरीक्षक नेमले; परंतु शहराध्यक्ष असूनही बाहेरील नेत्यांनी अवास्तव लुडबुड केल्याने पक्ष सोडत असल्याचे सांगून गावडे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर शहराध्यक्ष कोण, अशी स्पर्धा रंगली. यात नामदेव भगत आणि तुर्भेतील चंद्रकांत पाटील यांची नावे चर्चेत होती. अखेर नामदेव भगत यांना पक्षाध्यक्ष केले. त्यांच्या मदतीला शशिकांत शिंदे आणि उरणचे प्रशांत पाटील आहेतच.
तसे पाहिले तर तिन्ही नेत्यांचा नवी मुंबईचा अभ्यास आहे. शशिकांत शिंदे यांची माथाडी कामगारांसह पवार कुटुबीयांशी चांगले संबंध आहेत. काम करण्याची धमक आहे; परंतु साताऱ्यातील जावळी मतदारसंघाकडेही त्यांना पाहावे लागते. दुसरे नेते प्रशांत पाटील हे एकेकाळी गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक हाेते. नाईकांसोबत त्यांनी नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात काम केले आहे. अनेक वर्षे त्यांच्या सोबत राहिल्याने त्यांचे कच्चे-पक्के दुवे त्यांना माहीत आहेत; परंतु ते पक्षवाढीसाठी वापरण्यात ते कमी पडत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. राहिला प्रश्न तो जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा. मूळचे स्थानिक असल्याने आणि अनेक वर्षे महापालिका आणि सिडकोचे प्रतिनिधित्व केलेले असल्याने शहराची चांगली जाण त्यांना आहे; परंतु पक्षाकडून त्यांना अद्याप पाहिजे तसे बळ मिळालेले नाही, तसेच त्यांनी स्वत:हून पक्षासाठी एखादा मुद्दा घेऊन सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केलेले नाही. त्यामुळे पक्ष वाढणार कसा, असा कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे.
पक्षाच्या महिला अध्यक्षा नेरूळ अर्थात दारावे सोडून बाहेर पडायला तयार होत नाहीत. नवी मुंबई हे अठरापगड जाती-धर्मीयांचे शहर आहे; पण पक्षाचे सर्व नेते त्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणताही नेता सोशल मीडियावर पाहिजे तसा ॲक्टिव्ह दिसत नाही. याउलट पक्षाचा कोणताही कार्यकर्ता, एखादा व्यावसायिक, विविध क्षेत्रांतील एखादा मान्यवर या तिघांपैकी एकाला भेटला, तर दुसऱ्यांचे समर्थक नाराज होतात. ते आपल्या नेत्याला काही एक न कळवताच त्या व्यावसायिक अथवा मान्यवरांस दुहीचा संदेश देऊन मोकळे होतात. यामुळे महापालिका निवडणूक जवळ येऊनही शहरात राष्ट्रवादीची तीन तिघाडे अन् काम बिघाडे, अशी अवस्था झाल्याचे पाहावयास मिळत आहे.