कहाणी ‘अंतरंग’ म्युझियमच्या अस्तित्वाची!
By admin | Published: May 18, 2015 05:12 AM2015-05-18T05:12:12+5:302015-05-18T05:12:12+5:30
लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. शालेय वयातच लैंगिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती
मुंबई : लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. शालेय वयातच लैंगिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिल्यास त्याविषयीचे गैरसमज दूर होऊन समाज अधिक सजग होईल. मात्र लैंगिक शिक्षणाचे धडे देणारे ‘अंतरंग’ म्युझियम बंद झाल्याने आजही लैंगिक शिक्षणापासून समाजाला वंचित राहावे लागत आहे.
कामाठीपुरा भागात मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने २००२ मध्ये ‘अंतरंग’ हे सेक्स म्युझियम सुरू केले होते. शालेय विद्यार्थी, तरुण पिढीमध्ये एड्सबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे म्युझियम सुरू करण्यात आले होते. या म्युझियममध्ये वेगवेगळ््या माध्यमांतून एड्सविषयक माहिती देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ही इमारतच काही वर्षांपूर्वी तोडण्यात आल्याने येथील कलादालनही बंद झाले.
या म्युझियममध्ये ‘कामशास्त्र’ ग्रंथाच्या पहिल्या पानापासून सर्व संदर्भांची माहिती देण्यात आली होती. तसेच त्यानंतर ऊर्जेचा स्त्रोत मानले गेलेले शिवलिंग, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका, मातृसत्ताक पद्धती असलेल्या काळापासून ते आजच्या आधुनिक समाजाचे वारली चित्रकलेच्या माध्यमातून रेखाटलेले चित्र हे सारे सर्वप्रथम लक्ष वेधून घ्यायचे.
संग्रहालयात स्त्री-पुरुषाच्या शरीराची तपशीलवार माहिती मांडण्यात आली होती. शिवाय लैंगिकतेच्या मानसिकतेशी असलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकला जायचा. या म्युझियमचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ शारीरिक आकर्षणातून आलेल्या संबंधाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणारी पंख असलेली नग्नावस्थेतली तरुण स्त्री-पुरुषाची जोडी लक्ष वेधून घेत असे. पण म्युझियम बंद झाल्याने हे शिक्षणच थबकले आहे. (प्रतिनिधी)