धोरणात्मक प्रस्ताव मुख्य विषयपत्रिकेवर, तातडीच्या विषयांची पळवाट बंद, नगरसेवकांना अभ्यासाला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 02:33 AM2017-09-19T02:33:48+5:302017-09-19T02:34:33+5:30
सप्टेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर विकासकामांच्या २६ प्रस्तावांचा समावेश आहे. यापूर्वी महत्त्वाचे प्रस्ताव आयत्या वेळी सभागृहात सादर करण्याची चुकीची प्रथा रूढ झाली होती. या प्रथेला बगल देवून धोरण ठरविण्याचे प्रस्ताव मूळ विषयपत्रिकेवर घेतले आहेत.
नामदेव मोरे
नवी मुंबई : सप्टेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर विकासकामांच्या २६ प्रस्तावांचा समावेश आहे. यापूर्वी महत्त्वाचे प्रस्ताव आयत्या वेळी सभागृहात सादर करण्याची चुकीची प्रथा रूढ झाली होती. या प्रथेला बगल देवून धोरण ठरविण्याचे प्रस्ताव मूळ विषयपत्रिकेवर घेतले आहेत. यामुळे नगरसेवकांना अभ्यास करण्याची पुरेशी संधी मिळाली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील संवाद पुन्हा सुरू झाल्यामुळे कामकाजामध्ये पारदर्शीपणा येवू लागल्याचे मत पालिका वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासासाठीचे धोरण निश्चित केले जाते. प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करता यावी यासाठी एक आठवडा अगोदर विषयपत्रिका सर्व नगरसेवकांना देण्यात येते. परंतु अनेक वेळा महत्त्वाच्या विषयांवर जास्त चर्चा होवू नये व विषय नगरसेवकांना समजून घेण्याची संधी मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात होते. याचाच भाग म्हणून मुख्य विषयपत्रिकेवर महत्त्वाचे विषय घेतले जात नव्हते. सभा सुरू झाली की आयत्या वेळी महत्त्वाचे विषय सभागृहात मांडले जायचे व घाईगडबडीमध्ये ते मंजूर करून घेतले जात होते. २०१६ हे पूर्ण वर्ष तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्यामधील मतभेदामुळे गाजले. परिणामी धोरणात्मक निर्णय होवू शकले नाहीत. विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनी सर्वपक्षीयांशी योग्य समन्वय ठेवण्यात यश मिळविले आहे. प्रत्येक नगरसेवक व नागरिकांचे मत ऐकून घेण्यास सुरवात केली असून शहराचा अभ्यास केल्यानंतर विकासकामांना गती देण्यास सुरवात केली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल २६ महत्त्वाचे प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. यामध्ये वाशीमध्ये पादचारी पूल बांधणे, फिफाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची साफसफाई, महामार्गावरील भुयारी मार्गांची दुरुस्ती, आंबेडकर स्मारकाची अंतर्गत सजावट यांचाही समावेश आहे.
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह उभारले आहे. परंतु त्यांच्या देखभालीसाठी ठोस धोरण नाही. परिणामी प्रसाधनगृहांची दुरवस्था होवू लागली आहे. जुन्या धोरणामध्ये अनेक त्रुटी असल्याने नवीन धोरण निश्चित करण्यासाठीचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येत आहे. दिव्यांग नागरिकांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करणे, यादवनगर व गौतमनगरमध्ये शाळा बांधणे, मलनि:सारण केंद्रातील पाणी एमआयडीसीला पुरविणे व इतर अनेक महत्त्वाचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहेत. यामुळे १९ सप्टेंबरला होणाºया सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणते प्रस्ताव मंजूर होणार व कोणते वादग्रस्त ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
>घणसोलीसाठी
८५ कोटी
महापालिकेकडे हस्तांतर झालेल्या घणसोली नोडमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये ७ प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत. ८५ कोटी ९९ लाख रुपये खर्च करून दिवाबत्ती, रस्ते, पावसाळी गटारे, जलवाहिनी, मलनि:सारण वाहिनी, घणसोली सेक्टर १५ मधील बसडेपोजवळील डक्ट बांधणे व रोडची सुधारणा, सेक्टर २१ मधील पावसाळी गटार, मलनि:सारण वाहिनी, रबाळेमधील गोठीवली येथे मलउदंचन केंद्र बांधण्याच्या कामाचा समावेश आहे.
>पाण्यावर चालणारी बस
महापालिका क्षेत्रामध्ये जेएनपीटीच्या सहकार्याने पाणी व रोडवरून चालणारी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. पामबीच रोडवर ज्वेल आॅफ नवी मुंबईच्या होल्डिंग पाँडपासून मनपा मुख्यालयापर्यंत ही बससेवा सुरू केली जाणार आहे. १० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असून तो खर्च जेएनपीटी करणार आहे.
>दिव्यांगांना रोजगार
शहरातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने धोरण निश्चितीचा प्रस्ताव तयार केला आहे. यापूर्वी १७१ नागरिकांना जागांचे वाटप करण्यात आले आहे. त्यांचा करारनामा यापूर्वी संपला असून जागा देण्याविषयी अटी शर्ती ठरविण्यात येणार आहेत.
>सीबीएसई बोर्डाची शाळा
महापालिकेने यापूर्वी मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. आता पालिका क्षेत्रात दोन सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याविषयीचा प्रस्ताव सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
>माध्यमिकसाठी मध्यान्ह भोजन
पालिकेच्या माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना अन्नमित्र फाउंडेशनच्यावतीने पोषण आहार पुरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उसळ खिचडी, दाल राईस, भाजी चपाती, सांबर राईस, पुलाव दिला जाणार आहे. यासाठीचे साहित्य संस्थेकडून देण्यात येणार असून महापालिकेला ते शिजवून मुलांना देणार असून त्यासाठी ९८ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
>प्रसाधनगृहांची देखभाल
महापालिका क्षेत्रामध्ये ३१४ प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात आली आहे. यामधील अनेक प्रसाधनगृहांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. देखभालीसाठीच्या जुन्या धोरणामध्ये अनेक त्रुटी असल्याने प्रशासनाने नवीन धोरण तयार केले आहे. हे धोरण मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.
>हरित क्षेत्र विकास
केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत वाशी सेक्टर १० मधील स्वामी नारायण वॉटर पार्क ते सेक्टर ३० पर्यंत हरित क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.
>मलनि:सारणचे पाणी विकणे
केंद्र शासनाच्या अमृत मिशन प्रकल्पांतर्गत कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी २० दशलक्ष क्षमतेचे टर्शिअरी ट्रीटमेंट प्लांट बांधणे, सर्वसमावेशक देखभाल दुरुस्ती करणे व चालविणे यासाठी १३२ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे.