नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेवर २५ वर्षांपासून गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजपच्या माध्यमातून त्यांनी सत्ता टिकवून ठेवली आहे. या निवडणुकीमध्ये त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रस एकत्र येणार आहे. महाविकास आघाडीची पहिली बैठक नुकतीच सानपाडामध्ये झाली. यामुळे यावेळीही नाईक विरूद्ध सर्व अशी लढत पहायला मिळणार आहे.राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्येही पहावयास मिळणार आहे. निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी नुकतीच शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या सानपाडामधील पाम टॉवर इमारतीमधील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, अशोक गावडे, गणेश शिंदे, काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी व इतर प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीसाठीची प्राथमीक चर्चा या बैठकीत झाल्याचे सुत्रांनी सांगितले.कोणत्याही स्थितीमध्ये गणेश नाईक यांच्या ताब्यातून पालिका हिसकावून घेण्यासाठीची खलबते सुरू झाली आहेत. १९९५ पासून पालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सत्ता मिळविली. १९९९ मध्ये शिवसेना सोडल्यानंतरही त्यांनी पालिकेची सत्ता टिकवून ठेवली.राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर २००० च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेवून सत्ता मिळविली. २००५ व २०१० च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्पष्ट बहुमत मिळविले. २०१५ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने तकडे आव्हान उभे केले. परंतु नाईकांनी काँग्रेसला सोबत घेऊन पुन्हा सत्ता टिकविली.पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात गणेश नाईक यांना विधानसभा निवडणुकीमध्ये दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेना, स्वत:ची आघाडी, राष्ट्रवादी काँगे्रस व आता भाजपा असा राजकीय प्रवास केला. १४ वर्ष ठाणे जिल्ह्याचे मंत्रीपद भुषविले. राजकिय चढ - उतारामध्ये त्यांनी महापालिकेवरील सत्ता कायम राखली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांनी सत्ता कायम ठेवली आहे. नाईकांच्या ताब्यातून महापालिका मिळविण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. यावेळी कोणत्याही स्थितीमध्ये त्यांच्या ताब्यातून सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठीच महाविकास आघाडीचा प्रयोग राबविला जात आहे. भाजपमधील नाराज नगरसेवकांना फोडून आघाडीमध्ये आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. अनेक ज्येष्ठ नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे भासविले जात आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर नवी मुंबईची धुरा सोपविण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून त्यांना कितपत यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.फोडाफोडीचे राजकारणमहानगरपालिका निवडणुकीमध्ये नवी मुंबईमध्ये फोडाफोडीचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीपुर्वी स्वत: गणेश नाईक व परिवाराने राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँगे्रसच्या पाच नगरसेवकांच्या कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीमध्येही पक्षांतर मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता आहे. काँगे्रसमधून गेलेल्यांना पुन्हा परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नाईक समर्थक नगरसेवकांना शिवसेनेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडूनही इतर पक्षांमधील नगरसेवकांना पक्षात आणले जाण्याची शक्यता असून कोण किती फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रतिष्ठेची लढाईमहापालिकेची निवडणुकी भाजप व महाविकास आघाडी सर्वांसाठीच प्रतिष्ठेची बनली आहे. पंचवीस वर्षामध्ये गणेश नाईकांना दोन वेळा विधानसभेमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. परंतु महापालिका निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी कधीच सत्ता गमावलेली नाही. महापालिकेवर आतापर्यंत शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीने सत्ता मिळविली आहे. परंतु भाजपला एकदाही सत्ता मिळालेली नाही. यावेळी सत्ता मिळविण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेतेही पूर्ण ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे.स्थायी समितीमध्ये यशस्वी प्रयोगनवी मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व भाजपच्या मदतीने महापौरपद मिळविण्याचे प्रयत्न केले होते. नाईकांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु त्यास यश आले नव्हते. २०१६ मधील स्थायी समिती निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेने काँगे्रसच्या मदतीने सभापतीपद मिळविले होते. यावेळी महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
गणेश नाईक यांना रोखण्यासाठी रणनीती; महाविकास आघाडीच्या बैठका सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 2:53 AM