पनवेल : दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला पनवेलमधील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या २५ ते ३० जणांना पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला. शहरातील शिवाजी चौक परिसरात रविवारी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडले. ऐन सणासुदीला हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सध्याच्या घडीला कुत्र्याच्या निर्बीजीकरणावर कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही. दोन महिन्यांपूर्वी दर जास्त असल्याने निर्बीजीकरणाच्या टेंडरला स्थायी समितीने स्थगिती दिली आहे.
शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. पालिकेकडे याबाबत कोणतीच यंत्रणा नसल्याने हा त्रास वाढत चालला आहे. पालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला पाच हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्रे आहेत. रविवारच्या घटनेने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या घटनेत लहान मुलांनाही गंभीर दुखापत झाली आहे. कुत्र्याने ८ ते ११ वयोगटातील चिमुकल्यांचे अक्षरश: लक्तरे तोडले. यापैकी २४ जणांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत उपचार केले. इतर रुग्णांनी खासगी दवाखान्यात धाव घेत औषधोपचार केले. रात्री उशिरापर्यंत कुत्र्याने लचके तोडलेल्या नागरिकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्याकरिता पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती पालिकेचे स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिली.