विस्कळीत रेल्वे सेवेचा रस्ते वाहतुकीवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:39 AM2017-12-27T02:39:38+5:302017-12-27T02:39:55+5:30
नवी मुंबई : बेलापूर रेल्वेस्थानकावरून पनवेलच्या दिशेने जाणा-या फलाटावर ओव्हरहेड वायर तुटल्याने सलग चार तास हार्बरमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
प्राची सोनवणे
नवी मुंबई : बेलापूर रेल्वेस्थानकावरून पनवेलच्या दिशेने जाणा-या फलाटावर ओव्हरहेड वायर तुटल्याने सलग चार तास हार्बरमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बेलापूर स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वरून जाणाºया लोकलमध्ये सकाळी ९.४० वाजता करंट पास झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली त्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणास्तव लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या कारणास्तव सीएसएमटी ते पनवेल दरम्यानच्या वाहतूक सेवेवरही याचा परिणाम झाला. उरण-बेलापूर मार्गाच्या कामामुळे गेले चार दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, पाचव्या दिवशीदेखील प्रवाशांना वाहतुक समस्येला तोंड द्यावे लागले.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तासांनी वाहतूक पूर्ववत होणार असल्याने अनेक प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला. पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाºया प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेत इच्छित ठिकाण गाठले. या वेळी खासगी वाहनचालकांनी संधीचा गैरफायदा घेत प्रवाशांची लूट केली. ऐन कार्यालयीन वेळेत झालेल्या या तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने या वेळेत रेल्वेस्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. याचा परिणाम ट्रान्सहार्बर मार्गावरही झाला असून, या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दुपारनंतर लोकल वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
>खासगी वाहनांंचा आधार
पनवेल तसेच बेलापूर येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाºया नोकरदारवर्गाला खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागला. या वेळी खासगी वाहनचालकांकडून लूट करण्यात आल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसल्याची नाराजी या वेळी व्यक्त करण्यात आली. हार्बरमार्गावर सतत तांत्रिक बिघाड येत असल्याने येथील प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची माहिती प्रवासी संघटनेने दिली. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, याकडे गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनेने व्यक्त केली. महामार्गावर अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती, त्यामुळे नोकरदारवर्गाला मात्र लेटमार्क लागला.
>ब्लॉकनंतरही वाहतुकीचा खोळंबा
उरण-बेलापूर रेल्वेचे काम जलद गतीने सुरू असल्याने चार दिवस ट्राफिक ब्लॉक घेऊन या मार्गावरील रूळ जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्या दरम्यान जोडण्यात आलेल्या वायरिंगमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने पुन्हा या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवासी हैराण झाले. वीकेण्ड आणि नाताळच्या सुट्टीमुळे या दिवसांत प्रवाशांचे फारसे हाल झाले नाहीत. मात्र, मंगळवारी पेंटाग्राफ तुटल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. गर्दीच्या वेळेत झालेल्या या बिघाडाने हार्बर मार्गावरील वाहतूक कोलमडली होती, याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.