कोरोनाबाबत निष्काळजी करणाऱ्यांवर कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:40 AM2020-11-21T00:40:47+5:302020-11-21T00:40:57+5:30

पालिका आयुक्तांचा इशारा :नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Strict action against those who are negligent about Corona | कोरोनाबाबत निष्काळजी करणाऱ्यांवर कडक कारवाई

कोरोनाबाबत निष्काळजी करणाऱ्यांवर कडक कारवाई

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अधिक हानिकारक असेल याचे भान ठेवून महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढविली जात आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 


नागरिकांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले असून, जे निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महानगरपालिकेने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, नाेडल अधिकारी, उपायुक्त, विभाग अधिकारी यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीमध्ये ‘मिशन - ब्रेक द चेन’ काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्ण वेळेत शोधण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. शहरातील २३ केंद्रे, एपीएमसी व एमआयडीसीमधील विशेष केंद्रे अधिक कृतिशील करण्याच्या सूचना केल्या आहेत. फेरीवाले, दुकानदार, रिक्षाचालक, सार्वजनिक वाहनांचे चालक अशा मोठ्या प्रमाणात लोकसंपर्कात येणाऱ्यांची प्राधान्याचे तपासणी केली जाणार आहे. रुग्णांच्या संपर्कातील २४ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी केली जात असून, त्यामध्ये सातत्य ठेवले जाणार आहे.


महानगरपालिकेने रुग्णालय यंत्रणा सक्षम केली आहे. पुरेसा औषधसाठाही उपलब्ध केला आहे. ज्या सेंटरमधील प्रवेश थांबिवले आहेत, ती रुग्णालयेही पुन्हा तत्काळ सुरू करता येतील अशी तयारी केली आहे. कन्टेनमेंट झोनचे प्रभावी व काटेकोरपणे व्यवस्थापन केले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट जास्त हानिकारक असेल हे गृहीत धरून मास्कचा नियमित वापर करण्यात यावा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांसह नियुक्त केलेल्या दक्षता पथकांनी कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.


रेल्वे स्टेशन परिसरातही चाचणी केंद्र
नवी मुंबई महानगरपालिकेने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. २३ केंद्रे, एपीएमसी व एमआयडीसीमधील विशेष केंद्रांबरोबर आता रेल्वे स्टेशन परिसरात ॲन्टिजन चाचणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना तत्काळ चाचणी करता यावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.


मिशन ब्रेक द चेन - २
महानगरपालिकेने जुलैमध्ये मिशन ब्रेक द चेन अभियान सुरू केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली. आरटीपीसीआर व ॲन्टिजेन चाचण्यांची सुविधा उपलब्ध केली होती. आता महानगरपालिकेने ‘मिशन ब्रेक द चेन - २’ अभियान हाती घेतले असून, शहरवासीयांनी नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Web Title: Strict action against those who are negligent about Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.