नवी मुंबई : राज्यासह एमएमआर क्षेत्रातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संभाव्य संकट रोखण्यासाठी कोविड नियमांचे उल्लंघन करून वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचविणाऱ्या बेजबाबदार नागरिक व संस्थांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
रुग्णसंख्या वाढत असल्याने मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सतत हात धुणे वा सॅनिटाझरचा वापर करणे , आपल्या आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून निष्काळजीपणा पुन्हा एकवार आपल्याला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच जागरूक होऊन सामाजिक आरोग्याला आपल्यामुळे हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेत नागरिकांनी नियमांचे पालन करावे व महानगरपालिकेला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन महापालिका आयुक्त बांगर यांनी केले आहे.
दक्षता भरारी पथके पुन्हा कार्यान्वित
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात गठित केलेली नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांची संयुक्त दक्षता पथके शनिवारपासून कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांनी लग्न तसेच इतर सामाजिक कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणी तसेच मार्केट व इतर वर्दळीच्या ठिकाणी धाडी टाकून मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.