नवी मुंबई : कोरोनाची वाढती साखळी खंडित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मागील १५ दिवसांत ज्या भागांत जास्त प्रमाणात कोरोनाबाधित सापडले आहेत, त्या १२ हॉटस्पॉट ठिकाणांना विशेष प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात आठवडाभर कडक लॉकडाऊन घेण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ज्या ठिकाणी ५ पेक्षा अधिक बाधित व्यक्ती १०० मीटरच्या क्षेत्रात जवळजवळ आढळून आल्या आहेत. अशा ठिकाणी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार, शहरातील ३४ क्षेत्रे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट असणारी दिवाळे गाव, करावे गाव, तुर्भे स्टोअर, तुर्भे सेक्टर २१, सेक्टर २२, तुर्भेगाव, सेक्टर ११ जुहूगाव, सेक्टर १२२ खैरणे, बोनकोडे गाव, सेक्टर १९ कोपरखैरणे गाव, राबाडे गाव, चिंचपाडा ऐरोली अशी १० मोठी क्षेत्रे विशेष प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली होती. या ठिकाणी २९ जून ते ५ जुलै या कालावधीत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे, तसेच वाशीगाव आणि बेलापूर सेक्टर १ ते ९, सेक्टर २० या भागातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने, तेथेही मंगळवारपासून ६ जुलैपर्यंत प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे. या विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक काम अथवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यावर प्रतिबंध असणार आहे. त्याचप्रमाणे, विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये घरोघरी जाऊन महानगरपालिकेमार्फत मास स्क्रीनिंग मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.