लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी अचानक भेट दिली. भाजीपाला व फळ मार्केटमधील स्थिती पाहून आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जायचे नसल्यास कोरोनाविषयी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश त्यांनी व्यापारी व प्रशासनास दिले आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोनाविषयी नियमांचे सर्वाधिक उल्लंघन बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये होत आहे. मार्केटमुळे शहरातील प्रादुर्भाव वाढत आहे. याविषयी अनेक तक्रारी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडेही गेल्या आहेत. महानगरपालिकेने यापूर्वीही प्रशासनास सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. या सूचनांचे पालन केले जाते का? हे पाहण्यासाठी आयुक्तांनी अचानक भाजीपाला व फळ मार्केटला भेट दिली. आयुक्तांनी अचानक हजेरी लावल्यामुळे व्यापारी, कामगार, वाहतूकदार, खरेदीदार या सर्वांची धावपळ उडाली. मार्केटमध्ये बहुतांश नागरिकांकडे मास्क असल्याचे निदर्शनास आले. परंतु मास्क हनुवटीवर ठेवून व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनास आले. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले जात नसल्याचेही निदर्शनास आले. आयुक्तांनी संचालक व प्रशासनाशी चर्चा केली. शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी बाजार समितीमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. मार्केटमध्ये नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. परंतु कारवाईचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले. यापुढे नियमित कारवाई करण्याचे निर्देश दिले.बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन ६० हजार ते १ लाख नागरिक भेट देतात. देशभरातून वाहतूकदार येत असतात. या ठिकाणी कोरोनाविषयी नियमांचे काटेकोरपणे पालन झाले नाही, तर नवी मुंबईसह इतर शहरांमध्ये कोरोना पसरण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात लॉकडाऊनला सामाेरे जायचे नसल्यास नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. प्लॅस्टिक वापराविषयी नाराजीमहानगरपालिका आयुक्तांनी भाजीपाला व फळ मार्केटला अचानक भेट दिली असता मार्केटमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
बाजार समितीमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनास योग्य सूचना करण्यात आल्या असून, पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा अचानक भेट देऊन पाहणी केली जाईल. - अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका