CoronaVirus News in Navi Mumbai: नवी मुंबईत सोशल डिस्टन्सच्या नियमाला हरताळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:47 AM2020-05-01T01:47:29+5:302020-05-01T01:47:35+5:30
सोशल डिस्टन्सचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले जात आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. मागील चार दिवसांत कोरोनाचे १00 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेसह पोलीस यंत्रणांची झोप उडाली आहे; परंतु याचे कोणतेही सोयरसूतक नवी मुंबईकरांना नसल्याचे दिसून आले आहे. कारण लॉकडाउन असतानाही नागरिकांची अनेक भागात गर्दी होताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले जात आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई शहरात आतापर्यंत कोरोनाचे २३० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, मागील पाच दिवसांत तब्बल १२२ रुग्णांत वाढ झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या शहरवासीयांसाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे; परंतु काही लोकांना याचे अद्यापि गांभीर्य समजले नसल्याचे दिसून आले आहे. कारण लॉकडाउनचे आदेश झुगारून सर्रासपणे लोकांचा वावर सुरू आहे. खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे. विनाकारण रस्त्यांवर हुंदडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मॉर्निंग वॉकच्या नावाखाली सोशल डिस्टन्सच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया शेकडो नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईचे हे सत्र सुरूच आहे; परंतु शहरवासीयांच्या बिनधास्त वागण्यात कोणताही फरक पडल्याचे दिसत नाही. नागरिकांबरोबरच भाजी व फळ विक्रीचा व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांनीसुद्धा हैदोस घातला आहे.
वाशी सेक्टर १५ येथील बी-३ टाइप इमारत क्रमांक १ ते १२ समोरील रस्त्यांवर लॉकडाउनमध्येही फेरीवाल्यांची गर्दी दिसून येते. या ठिकाणी सकाळी खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून येथील फेरीवाल्यांना वारंवार सूचना केल्या जात आहेत; परंतु या सूचनांकडे कानाडोळा करीत फेरीवाल्यांनी व्यवहार सुरूच ठेवले. याच परिसरात असलेल्या मांस व मटण विक्रेत्यांकडूनही सोशल डिस्टन्सच्या नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
>रहिवासी असोसिएशनची तक्रार
वाशी सेक्टर १५ येथील बी-३ टाइप इमारतीच्या समोरील रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर बी-३ टाइप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या वतीने पोलीस, महापालिका प्रशासनाला गुरुवारी एक निवेदन दिल्याची माहिती आयुब खान यांनी ‘लोकमत’ला दिली. कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे संबंधित यंत्रणांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांसमोरे मोठे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचारी प्राणाची बाजी लावून रुग्णांची सेवा करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच राहवे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे. त्यानंतरसुद्धा काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.
एरव्ही मॉर्निंग वॉकच्या नावाने तिटकारा असलेली मंडळीसुद्धा सकाळच्या वेळी फिरायला घराबाहेर पडत आहेत. नवी मुंबईच्या प्रत्येक भागात कमी-अधिक प्रमाणात असेच चित्र पाहवयास मिळत आहे.
ऐरोली, घणसोली, कोपरखणे, वाशी परिसरात तर ठिकठिकाणी लोकांचे जथ्थे दिसून येत आहेत. शहरातील अशा बेशिस्त नागरिकांना आवर घालण्याचे आवाहन आता पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.