पनवेल: पगारास वारंवार उशीर होत असल्याने पाणिपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी दि.16 रोजी कामबंद आंदोलन पुकारले.पहाटे 4 वाजता अचानक पमीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.
मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे आणखी किती दिवस हे सहन करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.गुरूजी इंटरप्रायजेस या मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीकडून काम करणाऱ्या पाणिपुरवठा कर्मचाऱ्यांनी मात्र आंदोलनाचा पवित्रा उचलला. दिवाळी बोनस अर्धवट देणाऱ्या ठेकेदार व्यवस्थापनाकडून तीन वेळा वेगवेगळी तारीख देवून चालढकलपणा केला जात होता. ठेकेदाराकडून 15 तारीख देण्यात आली होती. परंतू 15 जानेवारीला देखील ही उर्वरित रक्कम जमा न झाल्यामुळे मंगळवारपासून कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. पहाटे 4 वाजल्यापासून पाणि सोडण्याचे काम महापालिका क्षेत्रातील 29 गावे आणि पनवेल शहरात बंद करण्यात आले.
नागरिकांच्या तक्रारी सुरू होताच पाणिपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता काम बंद केल्याचे समजले. कर्मचाऱ्यांना विनवणी करण्यास सुरूवात झाली. परंतू पगार झाल्याशिवाय काम करणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे अनेक दिवस न होणारा पगार ठेकेदार गुरूजी इंटरप्रायजेसने तातडीने सकाळी 9 वाजताच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला. पाणिपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता विलास चव्हाण यांनी पाणिपुरवठा सर्व्हिस केंद्रावर बैठक घेवून कर्मचाऱ्यांना काम सुरू करण्याची विनंती केली. यापुढे पगारास देखील विलंब होणार नाही अशी विनवणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना एक पाऊल मागे टाकत कामाला सुरूवात केली. त्यानंतर पनवेलकरांना पाणिपुरवठा सुरू झाला. काम बंद आंदोलनात पाणिपुरवठा विभागाचे ६० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.