विनापरवाना होर्डिंग्जच्या विरोधात कडक कारवाई

By admin | Published: November 22, 2015 12:45 AM2015-11-22T00:45:22+5:302015-11-22T00:45:22+5:30

शहरात उभारल्या जाणाऱ्या विनापरवाना होर्डिंग्जच्या विरोधात महापालिकेने आता कंबर कसली आहे. त्यानुसार होर्डिंग्ज लावणाऱ्यांच्या विरोधात थेट फौजदारी कारवाई करण्यात

Strong action against unauthorized hoarding | विनापरवाना होर्डिंग्जच्या विरोधात कडक कारवाई

विनापरवाना होर्डिंग्जच्या विरोधात कडक कारवाई

Next

नवी मुंबई : शहरात उभारल्या जाणाऱ्या विनापरवाना होर्डिंग्जच्या विरोधात महापालिकेने आता कंबर कसली आहे. त्यानुसार होर्डिंग्ज लावणाऱ्यांच्या विरोधात थेट फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत सात जणांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर बेकायदा होर्डिंग्जकडे डोळेझाक करणाऱ्या संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या होर्डिंग्ज संस्कृतीला प्रतिबंध घालण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. असे असले तरी कारवाईदरम्यान होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमण विभागाला मर्यादा पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून, अतिक्रमणे व बेकायदा होर्डिंग्जला आळा घालण्यासाठी साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यानुसार डॉ. कैलास गायकवाड यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच डॉ. गायकवाड यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा होर्डिंग्जच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत गेल्या तीन दिवसांत विनापरवाना होर्डिंग्ज लावणाऱ्या सात जणांच्या विरोधात शहर विद्रुपीकरण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आगामी काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत संबंधित विभागाकडून देण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा फिरत्या पथकांच्या माध्यमातून शहरातील होर्डिंग्जचा आढावा घेतला जाणार आहे. होर्डिंग्ज व जाहिरात फलक आढळून आल्यास ते तत्काळ काढून टाकले जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या वॉर्ड अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Strong action against unauthorized hoarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.