वैभव गायकर ।पनवेल : पनवेल महानगर पालिका हद्दीतील धोकादायक पाण्याच्या टाक्या हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडली. या विषयावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी आवाज उठवत धोकादायक पाण्याच्या टाक्यांबाबत पालिकेने पावले उचलण्याची मागणी यावेळी केली. यासंदर्भात उत्तर देताना आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पनवेल महानगर पालिका हद्दीतील धोकादायक पाण्याच्या टाक्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.पनवेल महानगर पालिकेमध्ये २९ गावे, पाच सिडको नोड व पनवेल नगरपरिषदेचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी पालिका हद्दीतील गावे व पनवेल शहरात धोकादायक पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे. कोणत्याही क्षणी याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सभागृहात या लक्षवेधीवर चर्चा करण्यात आली. भाजपा नगरसेवक नितीन पाटील, शेकाप नगरसेवक प्रमोद भगत यांनी देखील या विषयावर चर्चा केली. पालिका हद्दीतील टाक्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच काही टाक्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या आहेत. अनेक टाक्या जीर्ण झाल्याने त्या कोणत्याही क्षणी पडू शकतात.अशावेळी या टाक्या पालिकेने पाडून त्यांची नव्याने बांधणी करण्याची सूचना भाजपा नगरसेवक नितीन पाटील यांनी केली. यावेळी उत्तर देताना आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिका तत्काळ या सर्व टाक्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करेल, अशी माहिती सभागृहात दिली.>पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक धोकादायक टाक्यांचा समावेश असल्याचे सांगत शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी त्यांच्या राहत्या नावडे गावातील टाकीचे उदाहरण यावेळी सभागृहात दिले. या टाक्यांची उभारणी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या खासदार निधीतून १९९८ साली झाली असल्याचे सांगितले. सध्याच्या घडीला ही टाकी जीर्ण झाली असून या टाकीचा सभोवतालचा परिसर दाट लोकवस्ती व शाळा असल्याने या टाकीची पुननिर्मिती करणे गरजेचे आहे. याठिकाणी अनुचित घटना घडल्यास मोठी दुर्घटना घडेल अशी भीती यावेळी म्हात्रे यांनी व्यक्त केली. यावेळी सभागृहात त्यांनी या पाण्याच्या टाकीचे छायाचित्र देखील दाखविले.
धोकादायक पाण्याच्या टाक्यांचे होणार स्ट्रक्चरल आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 2:22 AM