माणिकगडचे ऐतिहासिक वैभव जपण्याची धडपड; दुर्गभेटीसह जंगलसफारीसाठी पर्यटकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 12:24 AM2020-10-13T00:24:03+5:302020-10-13T00:24:17+5:30
शिवप्रेमी करताहेत श्रमदानातून संवर्धनाचे काम, माणिकगड हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले पर्यटनस्थळ व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे राज्यातील दुर्गप्रेमींपर्यंत गडाची माहिती पोहोचू लागली आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेल्या किल्ल्यांमध्ये माणिकगडचा समावेश असतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गडाचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी शिवप्रेमींनी प्रयत्न सुरू केले आहेत. श्रमदानातून संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले आहे. गडास भेट देणारे पर्यटक व दुर्गप्रेमींची संख्या वाढत असून, जंगलसफारीसाठीही या किल्ल्यास पसंती दिली जात आहे.
राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या रसायनी-पातळगंगा परिसरात माणिकगडचा समावेश होतो. घाटावरून व कोकणातून होणाऱ्या व्यवसाय व रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये याचाही समावेश होतो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलामुळे व खळाळत्या झरे, धबधब्यांमुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक या परिसरात येतात. वडगाव, वाशीवली व ठाकूरवाडीतून जवळपास तीन तासांची पायपीट करून गडावर जातात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, टाकी, दरवाजा हा ठेवा नष्ट होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक नागरिक व स्वराज्याचे वैभव या समूहातील सदस्यांनी तीन वर्षांपासून गडसंवर्धनाचे काम सुरू केले आहे. पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढला आहे. चुन्याच्या घाण्याच्या परिसराची साफसफाई केली आहे. दरवाजाजवळ सफाई केली आहे. गडावर माहिती फलक लावण्यात आला आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिर परिसराचीही स्वच्छता करण्यात आली आहे.
माणिकगड हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले पर्यटनस्थळ व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे राज्यातील दुर्गप्रेमींपर्यंत गडाची माहिती पोहोचू लागली आहे.
माणिकगडचे महत्त्व : माणिकगड हा साधारणत: १६५७-५८ च्या दरम्यान स्वराज्यात सामील झाला. शाहू महाराजांच्या काळात मानाजी आंग्रे यांचा गडावर अंमल होता. सद्य:स्थितीमध्ये गडावर जुन्या बांधकामाचे अवशेष आढळतात. चुन्याचा घाणा, तटबंदी, बुरूज, ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या तसेच इतर अवशेषांसह पायथ्याशी सुस्थितीतील हनुमान मंदिर आहे.
‘स्वराज्याचे वैभव’ या बॅनरखाली समविचारी शिवप्रेमींनी तीन वर्षांपूर्वी माणिकगड संवर्धनाचे काम सुरू केले आहे. पावसाळा संपला की महिन्यातून किमान दोन दुर्गसंवर्धन मोहिमा आयोजित केल्या जातात. माहिती फलक लावणे, टाकी साफ करणे व इतर कामे केली जात आहेत. या कामांत स्थानिक नागरिकांचेही उत्तम सहकार्य लाभत आहे. - संदेश तिर्लोटकर, सदस्य, स्वराज्याचे वैभव