ठेकेदाराकडे पैसे मागणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:10 AM2018-10-21T06:10:13+5:302018-10-21T06:10:31+5:30
बांधकामाची पालिकेकडे तक्रार करून ठेकेदाराकडे खंडणी मागणा-या तोतया पत्रकाराला रबाळे पोलिसांनी अटक केली.
नवी मुंबई : बांधकामाची पालिकेकडे तक्रार करून ठेकेदाराकडे खंडणी मागणा-या तोतया पत्रकाराला रबाळे पोलिसांनी अटक केली. महेश वाघमारे असे त्याचे नाव असून, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनही तो ऐरोली परिसरात परिचित आहे. शुक्रवारी संध्याकाळी ठेकेदाराकडून चार हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.
वाघमारेने एका बांधकामाची तक्रार ऐरोली विभाग कार्यालयाकडे केली होती. या प्रकरणी त्याने सदर बांधकामाचे ठेकेदार नथुराम सैनीकडे ३० हजारांची मागणी केली होती. त्यावर तडजोड करत आॅगस्ट महिन्यात चार हजार रुपये व सप्टेंबर महिन्यात एक हजार रुपये घेतले होते. यानंतरही तो पैशांची मागणी करत होता. या प्रकरणी सैनी यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली होती, त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी तो सैनी यांच्याकडून पैसे स्वीकारण्यासाठी आला असता, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याने यापूर्वीही काही पालिका अधिकारी व अनधिकृत बांधकामांच्या अनेक ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. त्याच्या अंगझडतीमध्ये गुन्हे शोध व शिवराज अशा वृत्तपत्रांची ओळखपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे बाजारभावाने ओळखपत्रे वाटणारी साप्ताहिके, मासिके यांचाही अशा गुन्ह्यांशी संबंध असल्याची शक्यता आहे.