अरुणकुमार मेहत्रेलोकमत न्यूज नेटवर्क कळंबोली : पनवेल तालुक्यातील जि. प. शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक धडपड करत आहेत. शासनाकडून तसेच लोकसहभागातून शाळेची सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील जि. प. शाळा डिजीटल तर झाल्या आहेत. पण १७० शाळेत मुख्याध्यापकासह शिक्षकांना स्टाफरूम नसल्याची बाब पुढे आली आहे. पनवेल तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात २४८ जि. प. शाळा आहेत. शासनाकडून जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक विकासावर भर देण्यात येत आहे. त्याप्रमाणे भौतिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेत टिकण्यासाठीचा केलेला खटाटोप, जि. प. शाळांचा कायापालट करण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच डिजिटल शाळा करण्यात आल्या आहेत परंतु १७० शाळेत अद्याप मुख्याध्यापक कक्ष तसेच शिक्षकांसाठी स्टाफ रूम नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वर्ग व शाळेतील व्यवस्थापन एकाच खोलीत चालत आहेत. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे शिक्षक खासगीत सांगतात. कमी पटसंख्येच्या शाळेत मुख्याध्यापक नसतो तर १५० पेक्षा जास्त पट असलेल्या शाळेत मुख्याध्यापक पद असते. बहुतांश शाळा एकल आणि द्विशिक्षकी आहेत. बऱ्याच शाळांत स्टाफरूम तसेच मुख्याध्यापक कक्ष नसल्याने शिक्षकांना अडचणी येत आहेत.
शिक्षकांना करावी लागतात कामे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळेत शिपाई, क्लार्क, ही पदे नाहीत. शाळा उघडण्यापासून ते बंद करण्यापर्यंत सर्व कामे शिक्षकांना करावी लागतात. पटसंख्या लक्षात घेता कित्येक शाळा एकल आणि द्विशिक्षकी आहेत. अध्यापनाबरोबर शालेय कामेसुद्धा शिक्षकांना करावी लागत आहेत.
या आहेत अडचणी nबहुतांश शाळेत मुख्याध्यापकपदाचा पदभार हा सहाय्यक शिक्षकाकडे असतो. त्यामुळे अध्यापनासेबतच शाळेची कामे करावी लागत आहे तर एका शिक्षकाला एक किंवा दोन वर्ग सांभाळावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. nशाळेत स्टाफ रूम नसल्याने शिक्षकांना शालेय विषयावर सविस्तर चर्चा करता येत नाही. बैठक घेण्यासाठी त्यांना शाळेच्या वेळांव्यतिरिक्त इतर वेळ ठरवावी लागते किंवा बाहेरील मैदानाचा उपयोग करावा लागत आहे. तसेच सतत वर्ग घेतल्याने थोडा वेळ विश्रांतीसाठी किंवा वाचन करण्यासाठी स्टाफ रूमची आवश्यकता असते. ती नसल्याने शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष तसेच शिक्षकांसाठी स्टाफ रूम नसले तरी ज्ञान देण्याचे काम आमचे शिक्षक अविरतपणे करत असतात. विद्यार्थ्यांनाही पुरेशी व्यवस्था आहे. त्याचा कुठलाही त्रास होत नाही. शासनाच्या नियोजनानुसारच जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम, वर्गखोल्यांचे काम केले जाते. - महेश खामकर, गटशिक्षणाधिकारी, पनवेल