विद्यार्थी गणवेशापासून वंचित; महापालिकेच्या उदासीनतेचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:28 AM2018-11-02T00:28:09+5:302018-11-02T00:28:47+5:30
शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश मिळालेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी वापराचे कपडे घालून शाळेत जावे लागत आहे.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश मिळालेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी वापराचे कपडे घालून शाळेत जावे लागत आहे. पालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, विद्यार्थ्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे.
नवी मुंबई शहरातील गाव-गावठाण, झोपडपट्टी आणि कॉलनीमध्ये राहणाºया गरीब विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक शाळांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. पालिका शाळेत शिकणाºया प्राथमिकमधील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पाठ्यपुस्तके, बूट, मौजे आणि माध्यमिक विभागात शिकणाºया विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या, पाठ्यपुस्तके, बूट, रेनकोट, मौजे, पीटी गणवेश, स्काउट गाइड गणवेश, पीटीचे बूट यासारखे शालेय साहित्य पुरविण्यात येते. त्याचप्रमाणे पूरक पोषणआहार, मध्यान्ह भोजन यासारख्या सुविधाही पुरविण्यात येतात. पालिका शाळेतील सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे राज्यातील इतर महापालिका शाळांपेक्षा नवी मुंबई पालिका शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचा पटदेखील दरवर्षी वाढत आहे. पालिकेमार्फत देण्यात येणाºया गणवेश आणि शालेय साहित्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साली राज्य सरकारने शालेय साहित्य, गणवेश पालकांनी विकत घ्यावेत आणि त्याची बिले सादर केल्यावर त्यांच्या बँक खात्यावर पालिकेमार्फत पैसे टाकावेत, असे डीबीटी धोरण संपूर्ण राज्यात आणले. शासनाने आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने २०१६-१७ साली गणवेश बनविण्याचा ठेका पालिकेने रद्द केला. शासनाने आणलेल्या धोरणांची पालकांना कल्पना नसल्याने, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना आणि प्राथमिकमधून माध्यमिक विभागात गेलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागेल. २०१७-१८ साली प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बाजारात पालिका शाळेचे गणवेश उपलब्ध झाले नाहीत.
माध्यमिक शाळांचे गणवेश काहीच ठिकाणी मिळाल्याने अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. २०१८-१९ या चालू शैक्षणिक वर्षात राज्य सरकारने शालेय गणवेश पालिकेनेच पुरावावेत, असा नियम केला आहे. महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपले, तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झालेले नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून पालिकेच्या माध्यमातून गणवेश मिळाले नसल्याने शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना तसेच या पालिका शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना घरी वापरातील रंगबिरंगी कपडे घालून शाळेत यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.
पैसे न मिळाल्याने साहित्य खरेदीकडे पाठ
पालिकेमार्फत विद्यर्थ्यांना शैक्षणिक साहित्य न देता, डीबीटी धोरणाची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे धोरण आहे; परंतु गेल्या वर्षी शालेय साहित्य खरेदी करून शाळेत बिले जमा केल्यावरही अनेक पालकांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी केले नसून, एकही बिल महापालिकेकडे जमा झाले नाही. त्यामुळे शासनाच्या या धोरणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.
शासन नियमानुसार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला असून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप लवकरच करण्यात येईल.
- संदीप संगवे,
शिक्षणाधिकारी,
नवी मुंबई महापालिका