अभ्यासिकांचा विद्यार्थ्यांना आधार; २८०० जणांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:16 AM2020-01-01T02:16:15+5:302020-01-01T02:16:19+5:30
१४ ग्रंथालयांमध्ये ७० हजार पुस्तके केली उपलब्ध
- नामदेव मोरे
नवी मुंबई : वाचन चळवळ वाढविण्यासाठी महापालिकेने विभागनिहाय ग्रंथालय सुरू करण्यास सुरवात केली आहे. १४ ग्रंथालयांमध्ये तब्बल ७० हजार ८४० ग्रंथ उपलब्ध करून दिले आहेत. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसह जवळपास २८०० विद्यार्थी येथील अभ्यासिकेमध्ये नियमीत अभ्यास करत आहेत.
देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. प्राथमीक ते उच्च शिक्षण देणाºया सर्व प्रमूख संस्थांनी त्यांचे केंद्र याठिकाणी सुरू केले आहे. चांगले शिक्षण देणाºया संस्था येथे असल्या तरी त्यामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी २००४ पर्र्यंत अभ्यासिकांची सुविधा नव्हती. यामुळे महापालिकेने विभागनिहाय ग्रंथालय व अभ्यासीका सुरू करण्यास सुरवात केली.
२००४ मध्ये सीबीडी बेलापूरमधील गौरव म्हात्रे कला केंद्रामध्ये मध्यवर्ती ग्रंथालय व अभ्यासीका सुरू केली. याच ठिकाणी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. अभ्यासीकेचा लाभ घेवून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेमध्ये यश मिळविले.
नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षेसाठी परिश्रम घेण्याची जिद्द व चिकाटी होती. परंतु त्यांना संदर्भ ग्रंथ व अभ्यासीका नव्हती. ती कमतरता महापालिकेने पूर्ण केली. सद्यस्थितीमध्ये याठिकाणी तब्बल ५३८ विद्यार्थी नियमीत अभ्यास करण्यासाठी येत आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे विभागवार ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केली.
सद्यस्थितीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण १४ ग्रंथालय असून त्यापैकी दोन ठिकाणचा अपवार वगळता सर्व ठिकाणी अभ्यासीकांचीही सुविधा आहे. या ग्रंथालयांमध्ये ७० हजार ८४० ग्रंथ उपलब्ध असून स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक पुस्तकांचाही समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी वृत्तपत्र व इतर नियतकालीकेही उपलब्ध करून दिली जात आहेत.
सद्यस्थितीमध्ये गं्रथालयांचे १७५२ नियमीत सभासद असून जवळपास २८०० विद्यार्थी यामध्ये अभ्यास करत आहेत. अभ्यासिकेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागते. अभ्यासीकेमध्ये फोनचा वापर करण्यास मनाई असून कोणी गोंधळ करणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. यामुळे दिवसेंदिवस अभ्यासिकांना प्रतिसाद वाढू लागला आहे. लवकरच अजून दहा ग्रंथालय व १२ अभ्यासीका सुरू करण्यात येणार आहेत.
१९ तास अभ्यासिका खुली
नवी मुंबई महानगरपालिकेने काही अभ्यासीका विद्यार्थ्यांसाठी तब्बल १९ तास खुल्या केल्या आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यास करता येतो. अभ्यास करण्याच्या ठिकाणी देखभालीसाठी कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे.