नवी मुंबई : पदपथावर उघड्या विद्युत वायरवर पाय पडल्याने शॉक लागून विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. घणसोली सेक्टर ७ येथे शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेत मुलाचे दोन्ही पाय भाजले आहेत. यापूर्वी देखील उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरींमुळे शॉक लागण्याच्या घटना घडलेल्या असतानाही त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.घणसोली सेक्टर ७ येथील सिम्प्लेक्स वसाहतीमध्ये शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली आहे. तिथल्या ओम साईधाम सोसायटीमध्ये राहणारा साई वाडकर (८) हा पहिलीचा विद्यार्थी पदपथावरून घरी चालला होता. यावेळी पदपथावर उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरवर त्याचा पाय पडला. त्याच ठिकाणी वायर तुटलेली असल्याने साईला शॉक लावून वायरनेही पेट घेतला. यामध्ये त्याचे दोन्ही पाय जळाले असता, त्याठिकाणी उपस्थित काही नागरिकांनी त्याला वायरपासून बाजूला केले. यानंतर त्याला ऐरोलीच्या बर्न सेंटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत त्याचे दोन्ही पाय जळाले असून सुदैवाने थोडक्यात प्राण वाचले आहेत. रुग्णालयाकडून रबाळे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात जावून जखमी साईची विचारपूस केली. याचदरम्यान पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी येत असल्याचे समजताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सदर वायर भूमिगत करून टाकली. यामागे पुरावा नष्ट करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचा आरोप जखमी साईचे वडील अनिल वाडकर यांनी केला आहे. त्यामुळे मुलासोबत घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी जबाबदार सर्वांवर कारवाईची देखील मागणी त्यांनी केली आहे. घणसोली परिसरात अद्यापही जागोजागी महावितरणने असे मृत्यूचे सापळे रचले आहेत. रस्त्यालगत, पदपथावर उघड्या वायर पडलेल्या असून त्यापासून पादचाºयांच्या जीविताला धोका उद्भवत आहे. वर्षभरापूर्वी अशाच प्रकारातून घणसोली गावात एका मुलाचा प्राण देखील गमावला आहे. त्यानंतरही महावितरणकडून उघड्या डीपी बंदिस्त करण्याकडे व वायर भूमिगत करण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.>शहरात अनेक ठिकाणी उघड्या विद्युत डीपी व खुल्यावर पडलेल्या विद्युत वायरी पाहायला मिळत आहेत. वर्षानुवर्षे उघड्यावर पडलेल्या या वायरी उंदरांकडून कुरतडल्या गेल्याने अथवा त्यावरुन वाहने गेल्याने तुटण्याचे प्रकार घडतात. त्याठिकाणी एखाद्या पादचाºयाला शॉक लागण्याची शक्यता असते. तर पावसाळ्यात अशा बहुतांश ठिकाणी शॉर्टसर्किट होवून वीजपुरवठा खंडित होण्याचेही प्रकार घडत असतात.
पदपथावरील विद्युत वाहिनीचा शॉक लागून विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:22 PM