जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश
By योगेश पिंगळे | Published: April 25, 2024 06:07 PM2024-04-25T18:07:21+5:302024-04-25T18:08:23+5:30
नाटक हे संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याव्दारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे.
नवी मुंबई: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई क्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जागरूकता वाढविणारी पथनाट्ये बसविली आहेत. महानगरपालिकेच्या शाळांप्रमाणेच अनेक खाजगी शाळांमधूनही शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करणारी पथनाट्ये आपापल्या शाळा परिसरात सादर केली. विशेष म्हणजे ही पथनाट्ये शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळूनच लिहिलेली होती व शिक्षकांनी पथनाट्य स्वरुपात बसवून घेतली होती.
नाटक हे संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याव्दारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. समाज जागृतीचा संदेश हसत खेळत, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत लोकांपर्यंत पोहचवणारी पथनाट्ये नेहमीच जनजागृतीचे लोकप्रिय माध्यम राहिलेली आहेत. ही पथनाट्ये शाळेच्या परिसरात सादर होत असताना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहायला मिळाले. या पथनाट्यांच्या माध्यमातून भारतीय संविधान, लोकशाहीच्या सबलीकरणात मतदानाचे महत्व, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार, कर्तव्य म्हणून मतदान करण्याची नागरिकांची जबाबदारी अशा आशयास अनुसरुन मतदान करण्याचे संदेश प्रसारण पथनाट्यांतून करण्यात आले.
25 ठाणे लोकसभा निवडणूक 20 मे रोजी होणार असून मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने मतदार जनजागृतीकरिता नवी मुंबई महापलिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही या कामी पुढाकार घेतला असून स्वीप कार्यक्रमांतर्गत 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या सूचनांनुसार रांगोळी, चित्रकला, प्रभातफे-या, निबंध, पोस्टकार्ड लेखन असे अभिनव उपक्रम शाळांतून राबविलेले आहेत.
शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे व कल्पना गोसावी यांच्या नियंत्रणाखाली केंद्र समन्वयक यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांनाही मतदान विषयक जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांमार्फत पालकांकडे मतदान करण्याचा संदेश प्रभावी रितीने पोहचविला जात आहे. शाळांनी आपापल्या क्षेत्रात सादर केलेली पथनाट्ये ही मतदान विषयक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली आहेत.