विद्यार्थ्यांचा उपोषणाचा इशारा
By admin | Published: November 18, 2016 03:59 AM2016-11-18T03:59:39+5:302016-11-18T03:59:39+5:30
आग्रीपाडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा द्वितीय सत्र जुलै २०१६ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
नवी मुंबई : आग्रीपाडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा द्वितीय सत्र जुलै २०१६ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. सर्व्हेअर बॅच क्रमांक ७३ च्या एकूण ६६ विद्यार्थ्यांचा निकाल शून्य टक्के दाखविला जात आहे. नॅशनल काऊन्सिल आॅफ व्होकेशनल ट्रेनिंग यांच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सर्व्हेअर ट्रेड हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका ही दोन वर्षांच्या ट्रेडप्रमाणे तपासल्याचे स्पष्ट झाले आहे. योग्य न्याय मिळवून न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्राचार्यांना दिला आला.
ट्रेड थेअरी आणि वर्कशॉप कॅलक्युलेशन अॅण्ड सायन्स, इम्प्लॉयबिलिटी स्कील या दोनही पेपरचा निकाल शून्य टक्के लागल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
प्राचार्यांकडे जाऊन याविषयी माहिती दिली असता याबाबतीत गांभीर्याने दखल न घेतल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. संस्थेच्या सर्व प्रशिक्षणार्थींनी त्यांच्या निकालाबाबत खात्री दर्शविली असून योग्य निकाल लवकरात लवकर हाती यावा याकरिता प्रयत्नशील आहेत. याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक, राज्याचे पोलीस महासंचालकांना निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. या ६६ विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीची प्रतही ‘लोकमत’कडे दिली आहे.
(प्रतिनिधी)