नेरळ गावातील विद्यार्थी दाटीवाटीत घेताहेत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 01:21 AM2019-12-27T01:21:05+5:302019-12-27T01:21:18+5:30

कुंभारआळी शाळेची इमारत पाडून तीन वर्षे पूर्ण

Students in Nerala village are getting education in dormitories | नेरळ गावातील विद्यार्थी दाटीवाटीत घेताहेत शिक्षण

नेरळ गावातील विद्यार्थी दाटीवाटीत घेताहेत शिक्षण

Next

कांता हाबळे 

नेरळ : नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या कुंभारआळी भागातील शाळेच्या इमारती नवीन इमारत बांधण्यासाठी पाडण्यात आल्या आहेत. मात्र, त्या गोष्टीला तीन वर्षे पूर्ण झाली असून अद्याप त्या वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. दरम्यान, इमारत उपलब्ध नसल्याने त्या शाळेचे विद्यार्थी एकाच इमारतीमध्ये दाटीवाटीने बसून शिक्षण घेत आहेत.

नेरळ गावातील कुंभारआळी येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या तीन इमारती त्या ठिकाणी होत्या. त्या कौलारू इमारतीमध्ये पाच वर्ग आणि षट्कोनी इमारतीमध्ये एक, असे वर्ग त्या शाळेत भरविले जात होते. त्या सर्व इमारती २०१६ मध्ये जिल्हा परिषदेने पाडल्या असून, त्या जागी नवीन इमारती उभ्या करण्याची कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही.ज्या वेळी इमारती पाडण्यात आल्या, त्या वेळी त्या ठिकाणी १२ वर्गखोल्या बांधण्यात येणार होत्या. मात्र, त्या वर्गखोल्यांना मंजुरी होती का? जिल्हा परिषदेच्या परवानगीने इमारती पाडण्यात आल्या होत्या का? याबाबत उपोषणदेखील झाले होते आणि जिल्हा परिषदेने एक समिती गठीत केली होती. त्या समितीचे काय झाले आणि परवानगीचे काय झाले, याबाबत नेरळ ग्रामस्थांना काहीही देणे घेणे नाही. फक्त नेरळ ग्रामस्थांना शाळेची इमारत पाहिजे, अशी भूमिका नेरळचे उपसरपंच अंकुश शेळके यांनी घेतली होती. मात्र, आजतागत नेरळ कुंभारआळी भागातील शाळेची इमारत उभी राहू शकली नाही.
मात्र, इमारत तोडून तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी नवीन इमारतीचे कोणत्याही प्रकारचे बांधकाम जिल्हा परिषदेकडून करण्यात आले नाही. त्यामुळे नेरळ गावातील कुंभारआळी शाळेत जाणारे विद्यार्थी हे बाजूच्या शाळेत दाटीवाटीने बसत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करून त्या इमारतीत कुंभारआळी शाळेतील विद्यार्थी बसत आहेत. तर २०१६ मध्ये पाडण्यात आलेल्या तीन इमारतींतील काही वर्गखोल्यात अंगणवाड्या भरवल्या जायच्या. त्या अंगणवाड्या सध्या शिवाजी महाराज मैदानात भरवल्या जात आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन वर्गखोल्या बांधण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेकडून होण्याची आवश्यकता आहे; परंतु गेल्या तीन वर्षात भूमिपूजन झालेल्या इमारतीचे बांधकाम अद्याप होऊ शकले नाही, याचे आश्चर्य नेरळकरांना वाटत आहे. त्यामुळे १२ वर्गखोल्यांची दुमजली इमारत होण्याचे काम होईल तेव्हा होईल; पण पूर्वी ज्या सहा वर्गखोल्या कुंभारआळी शाळेच्या आवारात होत्या, त्या तर बांधून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.

कुंभारआळी शाळेची इमारत पाडली, तेव्हा नवीन किती वर्गखोल्या बांधण्यात येणार होत्या, याबद्दल काही माहिती नाही; पण आपण त्या जागेवर सहा वर्गखोल्या बांधण्याचे काम मंजूर करून घेतले आहे.
- अनसूया पादिर, सदस्या,
रायगड जिल्हा परिषद

नेरळ कुंभारआळी शाळेचा विषय हा चौकशीच्या फेऱ्यात असून, जिल्हा परिषद स्वतंत्र चौकशी करीत आहे. त्यामुळे आपल्याला त्याबाबत काहीही अधिक सांगता येणार नाही.
- सुरेखा हिरवे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, कर्जत
 

Web Title: Students in Nerala village are getting education in dormitories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.