नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणार दोन वर्षांचे गणवेश, ५१,८६७ विद्यार्थ्यांना लाभ
By नारायण जाधव | Published: March 26, 2024 05:22 PM2024-03-26T17:22:18+5:302024-03-26T17:23:05+5:30
गेल्या २०२३-२४च्या गणवेशाचा घोळ असताना आता प्रशासनाने थेट २०२४-२५ आणि २०२५-२६ साठीची गणवेश पुरवठ्यासाठी मूळ उत्पादक कंपन्यांकडून देकार मागविले आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या बालवाडी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या ५१,८६७ विद्यार्थ्यांना आता एक वर्षाचा नव्हे, तर दोन दोन वर्षांचा गणवेश पुरवठा करण्यात येणार आहे. यात शालेय गणवेश, पीटी, गणवेशासह स्काउट गाईडच्या गणवेशाचा समावेश आहे. गेल्या २०२३-२४च्या गणवेशाचा घोळ असताना आता प्रशासनाने थेट २०२४-२५ आणि २०२५-२६ साठीची गणवेश पुरवठ्यासाठी मूळ उत्पादक कंपन्यांकडून देकार मागविले आहेत.
दोन वर्षांच्या गणवेश पुरवठ्यावर महापालिका तब्बल २७ काेटी ५६ लाख ८५ हजार ४८६ रुपये खर्च करणार आहे. मात्र, विद्यार्थी संख्येनुसार यात कमी-जास्त फरक होऊ शकतो.
महापालिका शाळांमध्ये बालवाडी ते आठवीपर्यंत २२६६९ विद्यार्थी, २२,३५७ विद्यार्थिनी आणि उर्दू माध्यमाचे ३८६ विद्यार्थी शिकत आहेत. तर, आठवी ते दहावीपर्यंतचे ३१७५ विद्यार्थी, ३१९३ विद्यार्थिनी आणि उर्दू माध्यमाचे ८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
प्रत्येकी दोन शालेय गणवेश, पीटी आणि स्काउट गाईडचा एक गणवेश कंत्राटदाराने द्यायचा असून, त्यासाठी विद्यार्थ्यांची शाळेत जाऊन मापे घ्यायची आहेत.
पुरवठा करताना फाटलेले, खराब झालेले किंवा माप चुकलेले गणवेश पुरवठादाराने बदलून द्यायचे आहेत.
गणवेश पुरवठा वेळेत न केल्यास दोन लाखांपर्यंतच्या किमतीवर १० टक्के, तर दोन लाखांपर्यंत जास्त किमतीवर ५ टक्के दर आठवड्याला दंड आकारण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या गणवेशाचा दर्जा तपासण्यासाठी त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेच्या प्रमाणपत्रानंतरच पुरवठादारास देयक देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या गणवेशाचा दर्जा योग्य नसल्यास पुरवठादारास १५ दिवसांची नोटीस देऊन त्याचे म्हणणे ऐकून ठेका रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार आयुक्तांना असणार आहेत.