नामदेव मोरे, नवी मुंबई स्मार्ट नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज ४ ते ८ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. दगडखाण ते शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे साधन नसल्याने मुलांची रोजच दमछाक होत आहे. प्राथमिक शिक्षणाची समाधानकारक सोय असली तरी माध्यमिक शिक्षणासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय नसून अनेक ठिकाणी महामार्ग व रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत आहे. घरापासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर शाळा असावी अशी तरतूद आहे. नेरूळ पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर महापालिकेच्या चार व तेवढ्याच खाजगी शाळा आहेत. परंतु दुसरीकडे झोपडपट्टी परिसरात महापालिकेच्या प्राथमिक शाळाही वस्तीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहेत. फक्त तीनच माध्यमिक शाळा आहेत. ठाणे बेलापूर रोड व नेरूळ ते तुर्भेपर्यंतचा महामार्ग गरिबी व श्रीमंतीची रेषा बनली आहे. रोडच्या एका बाजूला घराजवळ शाळा आहे. तर दुसऱ्या बाजूला खाणमजूर व झोपडपट्टीमधील मुलांना पायपीट करावी लागत आहे. स्कूल बस परवडत नाही तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची काहीही सोय नाही. अशा स्थितीमध्ये या विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.खाजगी कंपन्यांची मदतपावणेमध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परिसरातील खाजगी कंपन्यांनी त्यांची वाहने उपलब्ध करून दिली आहेत. सकाळ, दुपार व सायंकाळ ही वाहने मुलांना मोफत शाळेपर्यंत घेवून जातात व पुन्हा घरी सोडतात. परंतु हा अपवाद वगळता इतर ठिकाणी अद्याप लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यापैकी कोणीच मदतीसाठी पुढे येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. सायन - पनवेल महामार्गावर नेरूळमध्ये सकाळी शेकडो मुले रस्ता ओलांडून शिरवणेमध्ये माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जात असतात. रमेश मेटल, महात्मा गांधी नगर, नोबल क्वारीमधून चार किलोमीटर अंतर पार करून ही मुले शाळेत पोहचतात. दगडखाणीमधील या मुलांचे आई - वडील रोजंदारीवर काम करून संसार चालवितात. मुलांना शाळेत सोडणे व पुन्हा घेवून येण्याएवढा वेळ त्यांच्याजवळ नसतो. यामुळे या विद्यार्थ्यांना एकट्यानेच रोड ओलांडून जावे लागत आहे. घरापासून शाळा खूपच लांब असल्यामुळे अनेकांना सातवी ते आठवीनंतर शाळा सोडावी लागत आहे. प्रवासामध्ये जास्त वेळ जात असल्यामुळे त्याचा परिणाम अभ्यासावरही होत आहे. शिक्षण मंत्र्यांना अहवाल इंदिरानगरमधील शिवसेना कार्यकर्ते महेश कोठीवाले व संतोष नेटके यांनी नेरूळ शिवाजीनगर ते दिघा परिसरातील झोपडपट्टी व तेथून महापालिकांच्या शाळेसाठी मुलांना किती अंतर पायी चालावे लागते याचे सर्वेक्षण सुरू केले आहे. शाळेपर्यंत जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा अहवाल तयार करून आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेते व शिक्षण मंत्र्यांना देणार असल्याची माहिती या तरुणांनी दिली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यातदगडखाणीमधील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणासाठी २ ते ४ किलोमीटर व माध्यमिक शिक्षणासाठी ४ ते ८ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. तुर्भे नाक्यावर रेल्वे पटरी, नेरूळमध्ये महामार्ग व इतर ठिकाणी ठाणे बेलापूर रोड ओलांडून जावे लागत आहे. एमआयडीसीमध्येही अवजड वाहनांचे प्रमाण जास्त असते. विद्यार्थ्यांसोबत पालक नसल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत. बोनसरीमध्ये दोघांना जीव गमवावा लागला आहे. तुर्भे रेल्वे अपघातामध्ये प्रत्येक वर्षी एका तरी विद्यार्थ्याचा मृत्यू होत आहे.
विद्यार्थ्यांची होतेय पायपीट
By admin | Published: February 04, 2016 2:44 AM