बौद्धिक क्षमता पाहून विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 01:15 AM2019-06-07T01:15:26+5:302019-06-07T01:15:33+5:30
विजय नाहटा : करिअर मार्गदर्शन शिबिराला उत्साही प्रतिसाद
नवी मुंबई : उज्ज्वल भवितव्यासाठी दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना कोणते शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, नोकरीच्या माध्यमातून देशसेवा कशी करता येते याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या करिअर मार्गदर्शन शिबिरात शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता पाहून करिअरची निवड करण्याचा सल्ला नाहटा यांनी विद्यार्थ्यांना दिला. शिबिराच्या माध्यमातून करिअरविषयी असलेले संभ्रम दूर होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा उत्साही प्रतिसाद या शिबिराला लाभला.
नवी मुंबई शहरात सुमारे ९0 टक्क्याहून अधिक नागरिक सुशिक्षित आहेत. जीवन जगताना आर्थिक नियोजनासाठी निवडलेल्या मार्गांना करिअर म्हटले जाते. दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे नेमके कोणते शिक्षण घ्यावे, चांगल्या व्यवसायासाठी कोणते क्षेत्र निवडवावे याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम असतो. या वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांना करिअर घडविताना मोठा आधार मिळतो.
शहरातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी हजारो रु पये खर्च करणे शक्य नाही यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी २८ मे ते १ जून या कालावधीत सीबीडी, नेरु ळ पूर्व आणि पश्चिम, सानपाडा आदी ठिकाणी करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये नाहटा आणि विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण, आवड, बौद्धिक, शारीरिक क्षमता आणि सामाजिक गरजा यांचा विचार करून करिअरची निवड करण्याचे आवाहन नाहटा यांनी विद्यार्थ्यांना केले.
सध्या व्यवसाय निवडीचे देखील हजारो मार्ग उपलब्ध असून त्याबाबत कोणतेही बंधन नसल्याचे त्यांनी सांगितले. आवड आणि कल ओळखण्याच्या अनेक चाचण्या देखील उपलब्ध असून त्यांचा वापर करून आवड निश्चित करण्याचा सल्ला नाहटा यांनी दिला. सामाजिक गरज देखील महत्त्वाची असून व्यवसाय निवड करताना याचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रातील नोकऱ्या आणि व्यवसाय याबाबत विविध पर्यायांची माहिती देखील यावेळी उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने फाउंडेशनच्या माध्यमातून माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली.