शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची धडपड
By admin | Published: January 11, 2017 06:15 AM2017-01-11T06:15:31+5:302017-01-11T06:15:31+5:30
आजच्या संगणक युगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे; परंतु याच्या उलटी परिस्थिती माथेरानमध्ये पाहावयास मिळत आहे.
माथेरान : आजच्या संगणक युगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे; परंतु याच्या उलटी परिस्थिती माथेरानमध्ये पाहावयास मिळत आहे. येथील प्राचार्य शांताराम गव्हाणकर विद्यामंदिरच्या कमी पटसंख्येमुळे येथील पीटी, संगीत व मराठी या विषयांतील शिक्षक अतिरिक्त झाले त्यामुळे माथेरानमधील एकमेव असलेली शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. या विद्यार्थ्यांनी याबाबत माथेरान नगरपरिषदेस निवेदन देऊन आम्हाला शिक्षण घेऊ द्या, असा टाहो नगरपरिषदेच्या सभागृहात फोडला.
माथेरान नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण दिले जात होते; परंतु काही वर्षांतच पालिकेच्या शाळेत ५वी ते ८वीच्या वर्गात दोन्ही शाळेत पटसंख्या कमी असल्याने त्या चालणे जिकरीचे झाले आहे. माथेरानची एकूण लोकसंख्या ४३८८ एवढी असून, दोन्ही शाळांची पटसंख्या पहिली ते १०वीपर्यंत ३६० असल्यामुळे दोन शाळा टिकणे मुश्कील झाले आहे. यासाठी पहिली ते ६वीपर्यंत नगरपरिषद प्राथमिक शाळेत शिक्षण द्यावे व ७वी ते १०वीपर्यंत प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिरमध्ये शिक्षण असावे, असे निवेदन तयार करून नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याकडे दिले. (वार्ताहर)