राजस्थानमध्ये अडकलेले विद्यार्थी स्वगृही, सर्वांची प्रकृती उत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:00 AM2020-04-30T02:00:45+5:302020-04-30T02:01:02+5:30
अखेर ते विद्यार्थी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
पनवेल : राजस्थान येथील कोटा येथे आयआयटी मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणुच्या प्रादुभार्वामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. अखेर ते विद्यार्थी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
तत्पूर्वी संबंधित विद्यार्थ्याना खारघरमधील ग्रामविकास भवनात ठेवण्यात आले. याठिकाणी विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना जिल्ह्यातील त्यांच्या राहत्या ठिकाणी पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तात्काळ पत्राद्वारे याबाबत विनंती केली होती. त्याचप्रमाणे राजस्थान सरकारसोबत त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर राजस्थान सरकारने रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थ्यांना मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आणि बुधवारी हे विद्यार्थी रायगडमध्ये पोहोचल्याने पालकमंत्र्यांच्या मागणीला यश आले. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विदयार्थ्यांना कोटा येथून रायगडला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. २८ एप्रिलला पहाटे कोटा
येथून या ३२ विद्यार्थ्यांना घेऊन बस निघाल्या होत्या.
>सर्व विद्यार्थ्यांना होम क्वारंटाइनच्या सूचना
लॉकडाउन कालावधी सुरू असून खबरदारी म्हणून त्यांची कोविड १९ चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर किमान २८ दिवसांपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
-दत्तात्रेय नवले, प्रांताधिकारी