एमपीएससी परीक्षेसाठी संधीचे बंधन असल्याने विद्यार्थी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 01:48 AM2021-01-11T01:48:09+5:302021-01-11T01:48:18+5:30
उमेदवारांसाठी संधीची कमाल मर्यादा निश्चित; काहींनी केले निर्णयाचे स्वागत
योगेश पिंगळे
नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी आता संधीची मर्यादा नक्की केली आहे. संधीची संख्या कमी झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. संधी कमी झाल्याने, या ठरावीक संधींचे सोने करण्याची वेळ असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वी अनेक विद्यार्थी नोकरी मिळाल्यानंतरही वयाची अट संपेपर्यंत परीक्षा द्यायचे. मात्र, आयोगाने बंधन आणल्याने विद्यार्थ्यांना सहा, मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नऊ संधीचे बंधन घातले आहे. मुलींना देण्यात येणाऱ्या संधींमध्ये वाहद करण्यात यावीत, तसेच मुलींसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचीही सुविधा असावी, असे मत परीक्षार्थी मुलींनी यक्त केले आहे. नेरुळमधील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा येथील ग्रंथालयात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अशा प्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
मुलींच्या संधीमध्ये वाढ करावी
अनेक मुलींना शिक्षणाची आवड असते, परंतु ठरावीक वयानंतर त्यांच्या लग्नाचा विचार केला जातो. लग्नानंतर त्यातील काही मुलींना शिक्षणाची संधी मिळते, परंतु संधीच्या बंधनामुळे त्या मुलींचे स्वप्न अर्धवट राहण्याची शक्यता आहे. मुलींना देण्यात येणाऱ्या संधीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.
- निलू पांडे , उमेदवार
दुसरा मार्ग अवलंबता येईल
हा निर्णय विद्यार्थ्यांनी सकारात्मक घेतला, तर योग्यच आहे. यामुळे जोपर्यंत विद्यार्थ्यांची तयारी होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी परीक्षेला बसणार नाहीत किंवा त्यांना योग्य वयातच दुसरा काही मार्ग अवलंबता येऊ शकतो.
- सुशांत कोळेकर,
उमेदवार
वेळ वाया जाणार नाही
परीक्षेला संधींची मर्यादा असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे, असेच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही आणि त्यांना करिअरसंदर्भात वेळीच योग्य निर्णय घेता येईल.
- आकाश शिंदे,
उमेदवार
निर्णय अतिशय योग्य
संधीचे सर्वांना समान बंधन असायला पाहिजे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर भविष्य घडवायचे आहे, ते त्या वेळेत सीरियसली अभ्यास करतील, त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. त्याचा फायदा विद्यार्र्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे.
- तुषार येचकर , उमेदवार