नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात धूम स्टाईल मोटारसायल चालविणारांनी धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी सायंकाळी ऐरोलीमध्ये मोटारसायकलस्वाराने पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांना धडक दिली. त्यांचा उजवा पाय मोडला आहे.
रबाळे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले उपनिरीक्षक शंकर शिंदे कार्यालयीन कामासाठ मोटारसायकलवरून इंद्रावती रुग्णालयात जात होते. सेक्टर ८ मधील सेंट झेविअर्स स्कूलजवळील चौकामध्ये आले असताना समोरून आलेल्या मोटारसायकलस्वाराने वेगाने येवून त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातामध्ये शिंदे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मोटारसायकल स्वाराने त्यांना उपचारासाठी घेवून जाण्याऐवजी तेथून पळ काढला. या प्रकरणी रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शहरात स्टंटबाज मोटारसायकलस्वारांविरोधात मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पामबीच रोडवर रात्री स्पोर्ट बाईकवरून रेस लावल्या जात असून त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.