लाच मागितल्याप्रकरणी उपनिरीक्षकावर गुन्हा, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:03 AM2017-09-28T04:03:25+5:302017-09-28T04:03:37+5:30
तक्रार दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या भावाकडे लाचेची मागणी करणा-या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : तक्रार दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या भावाकडे लाचेची मागणी करणा-या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये इतर कोणत्या अधिकाºयांचा समावेश आहे का याचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.
तक्रारदार व्यक्तीच्या चुलत भावाविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला सहकार्य करण्यासाठी लाच मागण्यात आली होती. अटकेनंतर कमी दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, शिवाय गुन्ह्यातून सुटकेसाठी मदत करण्याचेही आमिष देण्यात आले होते. त्याकरिता सीबीडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्निल वाघमारे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. यानुसार गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीच्या चुलत भावाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शाहनिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वप्निल वाघमारेविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक अंजली आंधळे अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये इतरही काही अधिकाºयांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. तसेच या तक्रारीवरून गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींना सुटकेसाठी न्यायालयीन प्रक्रियेत मदत करत असल्याचीही शक्यता वर्तवली जावू लागली आहे.