खांदेश्वर स्थानकातील सब-वे कायमच पाण्यात

By admin | Published: September 23, 2016 03:36 AM2016-09-23T03:36:37+5:302016-09-23T03:36:37+5:30

अनंत चतुर्दशीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पनवेल परिसरातील सखल भागाबरोबरच अंतर्गत रस्ते, महामार्गावरही पाणीच पाणी साचले आहे.

Sub-way in the Khandeshwar station is always in the water | खांदेश्वर स्थानकातील सब-वे कायमच पाण्यात

खांदेश्वर स्थानकातील सब-वे कायमच पाण्यात

Next

अरुणकुमार मेहत्रे , कळंबोली
अनंत चतुर्दशीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पनवेल परिसरातील सखल भागाबरोबरच अंतर्गत रस्ते, महामार्गावरही पाणीच पाणी साचले आहे. त्याचबरोबर खांदेश्वर रेल्वेस्थानकातील सब-वे सुध्दा पाण्यात गेल्याने प्रवाशांची त्रेधातिरपीट उडत आहे. स्थानकातील सब-वेमध्ये साचलेल्या पाण्याचा दिवसातून दोनदाच उपसा केला जात असल्याने इतर वेळी प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत जावे लागते. पाऊस असो वा नसो गेल्या दोन महिन्यांपासून खांदेश्वर स्थानकातील सबवे पाण्यात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रार करूनही रेल्वे तसेच सिडकोकडून लक्ष दिले जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल येथील हजारो नागरिक दररोज खांदेश्वर स्थानकातून प्रवास करतात. मात्र रोजच सब-वेतील पाण्यातून जावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक सध्या समस्यांच्या चक्र व्यूहात सापडले आहे. बडा घर पोकळ वासा या उक्तीप्रमाणे हे स्थानक बाहेरून चकाचक दिसत असले तरी आतमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. नियोजित वसाहतींबरोबरच सुनियोजित रेल्वेस्थानक असा प्रचार सिडको करीत आहे, मात्र हे स्थानक बांधताना आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर इतर गोष्टीचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे स्थानक कायमच समस्यांच्या गर्तेत अडकलेले दिसते. फलाटावर जाण्यासाठी सबवे बांधण्यात आले आहे. मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजनच न झाल्याने पावसाळ्याचे चारही महिने सबवे पाण्यात असतो. पाऊस थांबला तरी येथील पाण्याचा निचरा काही थांबत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते.
सबवेमध्ये जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या मध्यभागी असलेले रेलिंग तुटलेले आहेत. त्यामुळे ट्रेन पकडण्याच्या गडबडीत असलेले प्रवासी अनेकदा पाय घसरून पडतात. त्यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेल्या तीन दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खांदेश्वरमधील सब-वेमध्ये गुडघाभर पाण्यातून प्रवाशांना जावे लागले. तीनही दिवस सकाळीच सब -वेत कमरेइतके पाणी साचले होते. पाण्यातून जाण्याशिवाय प्रवाशांकडे अन्य पर्याय नाही. सबवेमध्ये पाणी साचत असल्याने अनेक प्रवासी फलाटालगत असलेल्या अवघड वाटेवरून जाणे पसंत करतात. मात्र रात्रीच्यावेळी ही वाट धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात सिडको-रेल्वे प्रकल्प कार्यालयात संपर्क साधला असता तेथून जबाबदार अधिकाऱ्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Web Title: Sub-way in the Khandeshwar station is always in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.