निवडणुकीत मिळालेले यश म्हणजे मुख्यमंत्र्यांवर दाखविलेला विश्वास - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 09:26 AM2021-01-20T09:26:33+5:302021-01-20T09:28:31+5:30
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वाशी येथील मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करून उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
नवी मुंबई: राज्यात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून राज्यातील जनतेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर टाकलेला विश्वास असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वाशी येथील मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करून उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पत्रकार परिषदेत शिंदे यांनी निकालाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या शहरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.वाशी येथील नवी मुंबई शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करून सोमवार, १८ जानेवारी रोजी सायंकाळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, रोहिदास पाटील, अतुल कुलकर्णी, हरिभाऊ म्हात्रे, नामदेव भगत, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, सेनेच्या महिला आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख संध्या वढावकर, महिला आघाडीच्या प्रमुख रंजना शिंत्रे यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.