नेरळ : नेरळ या रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायतीने गावातील शौचालयांमधील मैला काढण्यासाठी सक्शन पंप खरेदी केला आहे. यापूर्वी नेरळ ग्रामपंचायतीला अन्य ठिकाणावरून सक्शन पंप भाड्याने आणून मैला काढण्याचे काम करावे लागे. सात लाख रुपये खर्चाच्या सक्शन पंपामुळे नेरळ गावातील रहिवाशांना पडणारा आर्थिक भुर्दंड अत्यल्प होणार आहे. आयुब तांबोळी सरपंच असताना नेरळ ग्रामपंचायतीने सक्शन पंप असलेली टाकी खरेदी केली होती. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे या पंपाची क्षमता कमी पडत होती. दर सात-आठ दिवसांत घराच्या मागे असलेली आणि इमारतींमधील शौचालय टाकी साफ करावी लागते. अन्यथा टाकी ओव्हरफ्लो होऊन नागरिकांची गैरसोय होते. मागील अनेक वर्षे नेरळ ग्रामपंचायत मोहापाडा येथील भाड्याच्या सक्शन पंपाने मैला काढून नेण्याचे काम करीत होती. या पद्धतीमुळे नेरळ ग्रामपंचायतीला कोणताही नफा-तोटा होत नव्हता. कारण भाड्याने सक्शन पंप लोकांना किंवा सोसायट्यांना आणावे लागत असल्याने त्यांना भुर्दंड पडत होता. ही अडचण अनेक रहिवाशांनी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये येऊन सरपंच सुवर्णा नाईक आणि सदस्य यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी आपले सहकारी सदस्य असलेले मंगेश म्हसकर, नितेश शाह, राजेश मिरकुटे, प्रथमेश मोरे, सदानंद शिंगवा, अश्विनी पारधी, संजीवनी हजारे, अनीता भालेराव, मीना पवार यांना ही माहिती दिली. घरपट्टी बंद असल्याने मागील वर्षी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आर्थिक संकटात आल्या होत्या. नेरळ ग्रामपंचायतही आर्थिक संकटात आली असती. मात्र, योग्य आर्थिक नियोजन केल्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक टंचाई जाणवली नव्हती. आर्थिक स्थिती बेताची असतानाही नेरळ ग्रामपंचायतीने या दिवाळीत आपल्या कामगारांना बोनसही दिला आहे. त्याच कालावधीत सात लाख खर्च असलेला सक्शन पंप नेरळ ग्रामपंचायतीने खरेदी केला आहे.
नेरळ ग्रामपंचायतीने खरेदी केले सक्शन पंप
By admin | Published: November 11, 2016 3:17 AM