दिवा-पनवेल रेल्वे क्रॉसिंगवर लोखंडी पूल बसविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 02:35 AM2019-02-12T02:35:26+5:302019-02-12T02:35:38+5:30
महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा येथे पूल बांधण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर होते.
नवी मुंबई : महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा येथे पूल बांधण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर होते. परंतु सिडकोच्या अभियंता विभागाने जिकिरीचे प्रयत्न करीत १00 मीटरपैकी ५७ मीटरचा लोखंडी पूल बसविण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे हा पूल बसविण्यासाठी दिवा-पनवेल मार्गावर सात तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील हा सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे बोलले जात आहे.
सिडकोने २०११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कामाची गती मंदावली आहे. पहिल्या टप्प्याचे काम रखडल्याने उर्वरित दोन टप्पेसुद्धा रखडले आहेत, त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या ११ किमी अंतरावरील उन्नत मार्ग, पेंधर येथील कारशेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु कंत्राटदारांच्या वादामुळे स्थानकांचे काम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हा अडथळा सुद्धा दूर करीत उर्वरित कामासाठी चार नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. एकूणच नोव्हेंबर २0१९ पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा वाहतुकीला खुला करण्याचा निर्धार लोकेश चंद्र यांनी केला आहे. त्यानुसार संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या मार्गात तळोजा येथे दिवा-पनवेल रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू होते. या रेल्वे क्रॉसिंगवर शंभर मीटर लांबीचा लोखंडी पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे वजन साधारण १४00 टन इतके असणार आहे. रविवारी यापैकी ५७ मीटर लांबीचा पूल बसविण्यात आला. विशेष म्हणजे हा पूल बाजूला तयार करून हिल मेन रोलर्स सिस्टीमच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे. या लोखंडी पुलाची बांधणी करण्यासाठी मेट्रोचा डमी मार्ग बनविण्यात आला. त्यावर या पुलाची जोडणी करण्यात आली. भक्कमता व सुरक्षिततेसाठी पुलाला मेटलचा लेप देण्यात आला आहे.
रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या पोलवर सध्या हा पूल ५७ मीटरपर्यंत पुढे ढकलण्यात सिडकोला यश आले आहे. पुलाचा उर्वरित ४३ मीटर लांबीचा भाग बसविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन तासांचा एक आणि दोन तासांचे दोन असे एकूण तीन मेगाब्लॉक घ्यावे लागणार असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दिवा-पनवेल रेल्वे क्रॉसिंगवर शंभर मीटर लांबीचा लोखंडी पूल उभारण्याचे काम महत्त्वाचे व तितकेच जिकिरीचे होते. रविवारी त्यापैकी ५७ मीटर लांबीचा पूल बसविण्यात यश आले आहे. पुढील ४३ मीटर लांबीच्या पुलासाठी तीन टप्प्यात आणखी तीन मेगाब्लॉकची आवश्यकता आहे. त्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा सुरू आहे. मेगाब्लॉक मिळताच साधारण पुढील दहा बारा दिवसांत पुलाचे शंभर टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर यांनी व्यक्त केला आहे.