नामदेव मोरे
नवी मुंबई : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. दिघा विभाग कार्यालय क्षेत्रात फक्त २० सक्रिय रुग्ण असून या परिसराची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ८ पैकी ४ विभाग कार्यालय परिसरातील रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी झाली आहे.पालिकेने केलेल्या उपाययोजनांना यश येऊ लागले आहे. प्रत्येक नोडमधील रुग्ण संख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.६९ टक्के राहिले आहे. शहरातील ५१,७८८ रुग्णांपैकी तब्बल ४९,८४५ रुग्ण बरे झाले आहेत. नेरूळमध्ये सर्वाधिक ८,८८१ जण कोरोनामुक्त आहेत. पालिका आयुक्त अभिजित बांगर हे प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रनिहाय नियमित आढावा घेत असल्याव् व नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह कर्मचारीही परिश्रम घेत असल्याने शहरातील बहुतांश विभागांमधील रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२५ टक्के झाले आहे. प्रादुर्भाव कमी असला तरी मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.
९ नागरी आरोग्य केंद्रे परिसर कोरोनामुक्तीकडेशहरातील २३ नागरी आरोग्य केंद्रांपैकी ९ आरोग्य केंद्रांच्या परिसरातील रुग्णसंख्या २० पेक्षा कमी आहे. चिंचपाडामध्ये व कातकरी पाडा केंद्राच्या कार्यक्षेत्राच्या परिसरात फक्त ४ रुग्ण आहेत. यामुळे हे परिसर लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.