आपले यश समाजासाठी उपयुक्त असावे, MPSCत मुलींमध्ये पहिल्या येणाऱ्या सविता गर्जेच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:54 PM2020-06-22T23:54:25+5:302020-06-22T23:59:40+5:30
सानपाडा येथे राहणाऱ्या सविता मारुती गर्जे (२६) हिने एमपीएससीच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये सानपाडा येथील सविता गर्जे हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ती पोलीस उपअधीक्षक पदासाठी पात्र ठरली आहे, परंतु आपले ध्येय केंद्रीय लोकसेवा आयोग असून, त्यासाठीचीही तयारी सुरू असल्याचे तिने सांगितले आहे.
सानपाडा येथे राहणाऱ्या सविता मारुती गर्जे (२६) हिने एमपीएससीच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश मिळविण्यासाठी ती सलग तीन वर्षे कुटुंबापासून दूर पुणे येथे राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. आपले यश केवळ स्वत:पुरते नसावे, तर ते समाजासाठीही उपयुक्त असावे. याच भावनेतून आपण कतव्याशी प्रामाणिक राहणार असल्याचीही भावना तिने व्यक्त केली. वडील मारुती गर्जे हे बेस्टमध्ये कुलाबा डेपोत क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. आई गृहिणी असून, लहान भाऊ व बहीण शिक्षण घेत आहेत. सानपाडा येथील स्वामी विवेकानंद शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर बारावीनंतर तिने बॅचलर आॅफ फार्मसी केली, परंतु परीक्षेच्या निकालापूर्वी हातात नोकरी असतानाही ती न स्वीकारता स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. या दरम्यान यशाच्या मार्गातले अडथळे जाणून घेऊन अभ्यास हाच उपाय असल्याचे तिला ज्ञात झाले होते. त्यानुसार, सोशल मीडियापासून अलिप्त राहून मोबाइलचा वापर केवळ वाचनासाठी करून तिने एमपीएससी परीक्षेत यश संपादित केले.
एमपीएसी परीक्षा देताना उपजिल्हाधिकारी होण्याची इच्छा असताना, इतरही उपलब्ध पर्यायांबाबत तिचा संभ्रम होता. या दरम्यान ती काही पोलीस अधिकाऱ्यांना भेटली असता, पोलीस उपअधीक्षक पदाबाबत तिची उत्सुकता वाढली. कामाचा ताण व अनियंत्रित वेळ, यामुळे महिलांकडून फारसे या पदाकडे उत्सुकतेने पाहिले जात नाही, परंतु उपअधीक्षक झाल्यास महिलांवर होणाºया अत्याचार विरोधात कायदेशीर लढण्याचा अधिकार आपल्याला मिळेल, या भावनेतून तिने या पदाला प्राधान्य दिले. अंतिम परीक्षेत नेमकी याच पदासाठी तिची निवड झाली.
परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात ३ लाख ८० हजार परीक्षार्थी होते. त्यामधून दुसºया टप्प्यात ४ हजार जणांची निवड झाली असता, अंतिम मुलाखतीला १ हजार ३०० परीक्षार्थी पात्र ठरले होते. त्यामधून रिक्त पदांसाठी ४०० जणांची निवड झाली असता, त्यात सवितानेही बाजी मारली.
>केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे आपले मुख्य ध्येय असून, त्यासाठी एमपीएसी ही महत्त्वाचा आधार ठरणार असल्याची भावना सविता गर्जेने व्यक्त केली. त्याचीही तयारी तिने सुरू केली आहे. कोणतीही परीक्षा देताना सर्वात मोठे आव्हान हे आपली इच्छाशक्ती असते. अभ्यासातही आवडीचा पर्याय न ठेवता सर्वच विषयांचे ज्ञान मिळवत गेल्यास यशाचा मार्ग अधिक सोपा होतो. याच जिद्दीच्या जोरावर तिने स्वत:सह कुटुंबाचे व नवी मुंबईचे नाव उज्ज्वल केले आहे.