नवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ‘इंडिगो ए ३२०’ या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग करण्यात आले. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. विमानाचे लँडिंग होताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
नवीन वर्षात या विमानतळावरून प्रत्यक्ष प्रवासी आणि कार्गो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्यादृष्टीने तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी विमानतळावर ‘सुखोई’ या लढाऊ विमानाचे लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर रविवार, २९ डिसेंबर रोजी इंडिगोचे विमान उतरविण्यात आले. यावेळी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनी आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जून उजाडणार १७ एप्रिल २०२५ पासून देशांतर्गत विमानसेवेचे उद्घाटन होईल. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन होण्यास जून उजाडेल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. जेके शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.
विमानाला वॉटर सलामीइंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. याप्रसंगी प्रथेप्रमाणे ऑस्ट्रेलिया बनावटीच्या दोन अग्निशमन बंबांमधून विमानाला वॉटर सलामी देण्यात आली.