पालिका बनली अनाथांची माय, १२२ वृद्धांवर यशस्वी उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 11:13 PM2020-09-29T23:13:41+5:302020-09-29T23:14:08+5:30
१२२ वृद्धांवर यशस्वी उपचार : कोरोनाबाधितांसाठी आश्रमात उभारले उपचार केंद्र
नवी मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या अंध व गतिमंद वृद्धांच्या उपचारासाठी नवी मुंबई महापालिकेने आश्रमातच उपचार केंद्र सुरू करून त्यांना नवे जीवन दिले आहे. स्वत:हून काही न करू शकणाऱ्या अशा वृद्धांवर उपचारात येणाºया अडचणी लक्षात घेऊन पालिकेने हा प्रयत्न यशस्वी करून दाखवला आहे.
कोरोनाची बाधा होऊन मृत पावणाऱ्यांमध्ये वयस्कर व इतर आजार असणाºयांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे वयस्कर व्यक्तींची पालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. अशातच पालिकेपुढे नवे आव्हान उभे राहिले होते. ऐरोली येथील प्रेमदान आश्रमातील वृद्ध महिलांना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ही बाब समोर येईपर्यंत दोन महिलांचे मृत्यू झाले होते. त्यामुळे आश्रमातील सर्वच वृद्ध महिलांची कोरोनाची चाचणी करण्याचे ठरविण्यात आले, परंतु वयाची साठी ओलांडलेल्या या महिलांमध्ये दृष्टिहीन, विकलांग, तसेच गतिमंद अशा प्रकृतीच्या समस्या होत्या. यामुळे चाचणीसाठी त्यांना इतरत्र घेऊन जाण्यातही अडचणी होत्या. त्यामुळे प्रेमदान आश्रमातच या ज्येष्ठांची चाचणी करून पॉझिटिव्ह आढळणाºयांवर तिथेच उपचार करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला. त्यासंबंधीच्या सूचना मिळताच नागरी आरोग्य केंद्र प्रमुख डॉ.वर्षा तळेगावकर व डॉ.सचिन नेमाने यांच्या पथकाने प्रत्यक्षात येणाºया सर्व अडचणींना सामोरे जात आश्रमातच सर्व ज्येष्ठ महिलांची चाचणी केली. त्यामध्ये १४४ पैकी १२२ महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
यामुळे त्यांच्यावर उपचारासाठी आश्रमाच्या जागेतच काळजी केंद्र उभारण्यात आले. त्या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध राहतील, अशा चार महिला डॉक्टरांसह १५ परिचारिकांचे पथक करण्यात आले. त्यांच्याकडून गतिमंद, विकलांग, तसेच दृष्टिहीन महिलांच्या नियमित औषध उपचाराची काळजी घेतली जात होती.
११६ महिलांची मात
पालिकेच्या आरोग्य विभागाने या अनाथांची माय बनून कोरोना काळात दिलेल्या आधारामुळे ११६ वृद्ध महिलांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात एका ९० वर्षीय महिलेचाही समावेश आहे.