साखर-मसाले ६५ टक्के, अन्नधान्य ५५ टक्के घटले, नवी मुंबईत रोडावली परराज्यातील आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 03:01 PM2024-01-03T15:01:23+5:302024-01-03T15:02:28+5:30
भाजीपाल्याची आवक १० टक्क्यांनी, फळांची २५ टक्के, कांदा-बटाटा २० टक्के, तर अन्नधान्याची ५५ टक्के आणि साखर-मसाल्याची ६५ टक्के आवक कमी झाली आहे.
नवी मुंबई : बंदमुळे अनेक वाहनचालकांनी गाड्या बाहेर न काढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य, साखरे, मसाल्यांची आवक घटली. भाजीपाल्याला अजून फार फटका बसलेला नाही. ग्राहक कमी आल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर होते. आंदोलन सुरू राहिल्यास दोन दिवसांत दर वाढू शकतात, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली हाेती.
भाजीपाल्याची आवक १० टक्क्यांनी, फळांची २५ टक्के, कांदा-बटाटा २० टक्के, तर अन्नधान्याची ५५ टक्के आणि साखर-मसाल्याची ६५ टक्के आवक कमी झाली आहे.
वाहनांची संख्या
मार्केट आंदोलनापूर्वी आता
कांदा-बटाटा १६३ १३१
फळे ३०२ २२८
भाजीपाला ५६३ ५१६
साखर-मसाले १६७ ५९
अन्नधान्य १४० ६४
एनएमएमटी कोलमडली
आंदाेलनामुळे टँकर पोहोचू न शकल्याने पेट्रोल-डिझेलसह गॅसची वाहतूक मंदावली. त्याचा फटका नवी मुंंबई महापालिकेच्या परिवहन सेवेला (एनएमएमटी) बसला. यामुळे परिवहन सेवेचे वेळापत्रक बऱ्यापैकी कोलमडल्याचे एनएमएमटीने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले.
नवी मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त
वाहतूकदार हिंसक होऊ नयेत यासाठी नवी मुंबई, उरण-पनवेल परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर, मुंबई-पुणे, जेएनपीटी ते पनवेल, मुंबई-गोवा आणि एक्स्प्रेस वेवर पोलिस होते. अनेक ठिकाणी वाहतूकदारांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली होती.