लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : दीडशे वर्षांहून जुनी नगरपालिका बरखास्त होऊन पनवेल महापालिकेची राज्यातील २७वी महापालिका स्थापना झाली आहे. मुंबईचे प्रवेशद्वार, आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिकीकरण, ग्रामीण भाग आदींसह या नव्याने स्थापन झालेल्या महापालिकेला साजेसे बोधचिन्ह तयार व्हावे, याकरिता पनवेल महापालिकेने बोधचिन्ह बनविण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. याकरिता उत्कृष्ट बोधचिन्ह (लोगो) बनविणाऱ्याला पालिकेकडून बक्षीस म्हणून रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. १ जुलैपर्यंत बोधचिन्ह जमा करायचे असल्याने केवळ आठ दिवसांत कलाकारांनी चिन्ह बनवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. १८ वर्षांवरील भारतीय नागरिक, व्यक्ती, समूह या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. १ आॅक्टोबर २०१६ रोजी महापालिकेची स्थापना झाली. महानगरपालिकेचे बोधचिन्ह त्या शहराचा इतिहास, भूगोल तसेच संस्कृतीची माहिती देणारे असते. यामुळेच बोधचिन्ह तयार करण्याची जबाबदारी येथील रहिवाशांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे बोधचिन्ह पनवेल महानगरपालिकेची कायमस्वरूपी ओळख निर्माण करणारे असावे, अशी अपेक्षा आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धकाने panvelcorporation@gmail.com या मेल आयडीवर बोधचिन्ह जेपीईजी, जेपीजी, पीएनजी, एसव्हीजी यामध्ये पाठवायचे आहे. स्पर्धकाने स्वत:ची संपूर्ण माहिती फोटोसह मेल करायचा आहे. जास्तीत जास्त कलाकारांनी महापालिका लोगो बनविण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. प्रथम पारितोषिकासाठी ज्याचे बोधचिन्ह निवडले जाईल, त्याला महापालिकेने २५ हजार रुपयांचे व पाच उपविजेत्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये जाहीर केले आहेत. स्पर्धेचा निकाल महापालिकेच्या वेबसाइटवर जाहीर केला जाईल.
बोधचिन्ह सूचवा; बक्षीस मिळवा
By admin | Published: June 25, 2017 4:10 AM