ऑनलाइन करभरणा सुलभ करण्याच्या सूचना; महापालिका आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 01:19 AM2020-12-15T01:19:11+5:302020-12-15T01:19:15+5:30
महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ताकराचा वाटा महत्त्वाचा आहे
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ताकराचा वाटा महत्त्वाचा आहे. जास्तीतजास्त कर संकलित करण्यासाठी या विभागाची कार्यप्रणाली लोकाभिमुख करण्यात यावी. ऑनलाइन करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
मालमत्ता कर विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी आयुक्तांनी विशेष बैठकीचे आयोजन केले हाेते. कोरोनामुळे या वर्षी करवसुलीवर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे करवसुली अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात यावे. करभरणा करण्याकरिता नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, नागरिकांनी दाखल केलेले अर्ज वेळेत निकाली काढण्यात यावे. तक्रारी प्रलंबित ठेऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या. कर भरण्यासाठी नागरिकांना बिलभरणा केंद्रात जाण्याची वेळ येऊ नये. ऑनलाइन प्रणाली सहज वापरता यावी, यासाठी झीरो पब्लिक कॉन्टॅक्ट राहील, याकडे लक्ष द्यावे. बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आदी अधिकारी उपस्थित हाेते.
अभय योजना
मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी १५ डिसेंबरपासून अभय योजना राबविण्यात येत आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. थकीत रक्कम व त्यावरील २५ टक्के दंडाची रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.