अभ्यासाचा तणाव! दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या; नेरुळ आणि करावे मधील धक्कादायक घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 11, 2023 07:57 PM2023-12-11T19:57:46+5:302023-12-11T19:58:08+5:30
दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई : दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नेरुळ व करावे येथे या घटना घडल्या असून दोन्ही मुलांना अभ्यासाचा तणाव होता असे समोर आले आहे. त्यामुळे एकाने तलावात उडी मारून तर दुसऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जड झालेल्या शिक्षणाचा भार विद्यार्थी पेलवू शकत नसल्याचे धक्कादायक घटनेवरून समोर आले आहे. नवी मुंबईत काही तासाच्या अंतराने दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. नेरुळ व करावे गाव याठिकाणी या घटना घडल्या असून त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. करावे येथे राहणाऱ्या दर्शील पाटील (१५) याच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर आई त्याचे व त्याच्या लहान बहिणीचे संगोपन करत आहे. यामुळे दर्शील याच्यावर कुटुंबियांच्या अपेक्षा होत्या. मात्र अभ्यास जड जात असल्याने आपण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही असे सतत त्याला वाटत होते. यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. अखेर रविवारी मध्यरात्री त्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मॅसेज बहिणीसह कुटुंबियांना पाठवला होता. सोमवारी पहाटे तो घरात आढळून न आल्याने परिसरात त्याचा शोध सुरु असताना करावे येथील तलावालगत त्याची चप्पल आढळून आली. यामुळे पाण्यात शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.
तर नेरुळ सेक्टर १६ येथील पृथ्वी प्रमोद ढवळे (१४) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तो नववी मध्ये शिकत होता. रविवारी संध्याकाळी त्याच्या घरातील सर्वजण खरेदीसाठी घराबाहेर गेले होते. यामुळे तो घरात एकटाच असताना त्याने बेडशीटच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री अकराच्या सुमारास घरातील परत आल्या असता दरवाजा आतून बंद होता. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला असता पृथीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अभ्यास कठीण जात होता असे पोलिस तपासात समोर आले आहे. यामध्ये त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या दोन्ही घटनांनी शहरात पालक वर्गांमध्ये खळबळ उडाली आहे.