सलमानच्या हत्येसाठी सुक्खा देणार होता शस्त्र; पनवेल पोलिसांनी पानिपतमधून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:37 PM2024-10-18T12:37:55+5:302024-10-18T12:40:12+5:30
सहा महिन्यांपूर्वी सलमान खानच्या फार्म हाऊसच्या रेकीप्रकरणी अटक केलेल्या पाचजणांच्या माहितीत त्याचे नाव पुढे आले होते...
नवी मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या हत्येसाठी हत्यार पुरवणार असल्याच्या संशयातून पानिपतमधून सुक्खा ऊर्फ सुखबीर याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याठिकाणी तो हॉटेलमध्ये वास्तव्याला असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी हरयाणा पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. सहा महिन्यांपूर्वी सलमान खानच्या फार्म हाऊसच्या रेकीप्रकरणी अटक केलेल्या पाचजणांच्या माहितीत त्याचे नाव पुढे आले होते.
अभिनेता सलमान खान याच्या पनवेलमधील फार्म हाऊसच्या रेकीप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी पाचजणांना अटक केली होती. यावेळी लॉरेन्स बिष्णाेई टोळीकडून सलमान खानच्या हत्येचा कट रचला जात असल्याची बाब उघड झाली होती. त्यातूनच ५० ते ६० जणांनी सलमानच्या फार्म हाऊसची रेकी केली होती, तर अटक केलेल्या पाचजणांच्या चौकशीत त्यांना सलमानची हत्या करण्यासाठी सुक्खा ऊर्फ सुखबीर हा हत्यार पुरवणार होता, अशी माहिती उघड झाली होती. त्यावरून पनवेल शहर पोलिस मागील सहा महिन्यांपासून सुखबीरच्या मागावर होते. अखेर दोन दिवसांपूर्वी तो पानिपत येथील हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पनवेल शहर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन हरयाणा पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.
पाकिस्तान कनेक्शन उघड होणार
सुखबीर याचे लॉरेन्स बिष्नोई टोळीशी संबंध असून, तो पाकिस्तानमधील काही व्यक्तींशी संबंध असल्याचीही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे सुखबीरच्या अटकेने चौकशीत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.