पनवेल : वाहतूक नियम पाळा, हेल्मेटचा वापर करा, असे विविध संदेश देणाऱ्या मोटारसायकल रॅलीने सोमवारी आरटीओ कार्यालयातर्फेआयोजित रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये सहभागी प्रत्येक दुचाकीचालक व पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट परिधान केले होते. हेल्मेटच्या जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.9 ते 23 जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. पनवेल आरटीओ कार्यालय येथून काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅली कळंबोली सर्कल, आसूडगाव बस डेपो, खांदा वसाहत उड्डाणपूल, सिग्नल, सिमरन मोटर्स, पनवेल बसस्थानक, आयटीआय कॉलेज, शिवाजी पुतळा, खांदा वसाहत, खारघर येथून पुन्हा आरटीओ कार्यालयात सांगता करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपायुक्त नितीन पवार, तहसीलदार दीपक आकडे यांच्या हस्ते या रॅलीस हिरवा झेंडा दाखिवण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, पोलीस निरीक्षक गोरख पाटील, मोटर निरीक्षक प्रदीप शिंगारे यांची उपस्थिती होती. रॅलीमध्ये ५० ते ६० मोटारसायकल चालकांनी सहभाग नोंदविला. रॅलीद्वारे हेल्मेटच्या वापरासह वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)
हेल्मेट रॅलीने अभियानाची सांगता
By admin | Published: January 24, 2017 6:02 AM