- प्राची सोनवणे, नवी मुंबई उन्हाळ््याची सुटी सुरु होताच एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देऊन सुटीचा आनंद घेण्यासाठी कौटुंबिक सहलीचे आयोजन केले जाते. मेट्रो सिटीमधील धावपळीचे जीवन, घड्याळाच्या काट्यावर सुरु असलेले काम यामधून निवांतपणा अनुभवण्यासाठी तसेच रिफ्रेशमेंटसाठी या सहली उपयोगी ठरत आहेत. दार्जिलिंग, सिक्कीम, कुलू मनाली, नैनिताल, काश्मीर या पर्यटनस्थळांना सर्वाधिक पसंती असून दोन महिन्यांपासून बुकिंग सुरु आहे.शहरातील दमट हवा, घामाघूम करणारे वातावरण यामुळे थंड हवेच्या ठिकाणांची निवड केली जात असल्याची माहिती टुरिस्ट कंपन्यांनी दिली. आॅफिसचा व्याप, रोजचे असाईनमेंट्स या गोष्टीला कंटाळलेल्या लोकांना चिंतामुक्त राहण्याची गरज असून त्यानुसार वेगवेगळ््या सहलींचे आयोजन केले जाते. या सहलीमध्ये अध्यात्म, बॉडी मसाज आणि रिलॅक्सेशन, स्पा, ब्युटी ट्रीटमेंटचा समावेश असून २ दिवसांपासून ते ६ दिवसांपर्यंत पॅकेजेस उपलब्ध आहेत. यामध्ये प्रत्येकी १० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंतचे पॅकेज उपलब्ध आहेत. शहरातील नामांकित टुरिस्ट कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध आॅफर्स ठेवल्या असून १० टक्क्यांपासून ते ४० टक्के पर्यंतची सूट या माध्यमातून दिली जात आहे. १२ हजारांपासून ते ३ लाखांपर्यंत विविध पॅकेजमध्ये परदेशी प्रवास करु इच्छिणाऱ्या पर्यटकांनी दुबई, मलेशिया, सिंगापूर, थायलंड या स्थळांना पसंती दिली असून महिनाभरापूर्वीच बुकिंग फुल्ल झाल्याची माहिती कंपन्यांनी दिली. १०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील परीक्षेनंतर रिलॅक्स होण्यासाठी स्टुडंट्स स्पेशल टूरचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीबरोबरच रिव्हर क्रॉसिंग, हेलिकॉप्टर राइड, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण यांचाही समावेश आहे. सामाजिक पर्यटनाकडे सर्वाधिक कलमहाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे सामाजिक सहलींचे आयोजन केले जात असून हेमलकसा, आनंदवन तसेच अहमदनगरमधील राळेगणसिध्दी, सावली स्नेहालय, गडचिरोलीतील शोधग्राम, मेळघाटातील बांबू प्रकल्प, पुण्यातील विज्ञान आश्रम या सामाजिक सहलींना पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात कल असून सुटी खऱ्या अर्थाने सार्थकी लावल्याचे समाधान पर्यटकांना मिळते.महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे ‘अमृतयात्रा’ या माध्यमातून सामाजिक पर्यटन उपक्रम राबविले जात असून समाजाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी तसेच समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी या सामाजिक सहली उपयोगी ठरत असल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या अधिका-यांनी दिली.महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळावी याकरिता सिडको व महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील अर्बन हाट येथे महाटुरिझम महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तरुणांचा साहसी पर्यटनाकडे कलतरुणाईमध्ये असलेला जल्लोष, उत्साह तसेच काही तरी नवी करण्याची उमेद पाहता त्यानुसार शक्कल लढवत अॅडव्हेंचर कॅम्पचे आयोजन करण्यात येते. यामध्ये ट्रेकिंग, स्कुबा डायव्हिंग, वन्यजीवांचे निरीक्षण, जंगल सफारी, बलून राईड अशा विविध साहसी गोष्टी अनुभवण्याची संधी मिळते. साहसी पर्यटनातून निसर्गाला जवळून अनुभवण्याची संधी मिळते यामुळे तरुणांची सर्वाधिक पसंती असून वीस हजार ते दीड लाखांपर्यंतचे पॅकेजमध्ये या सहली उपलब्ध आहेत.
उन्हाळी सुट्यांसाठीचे बुकिंग फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 3:07 AM