नवी मुंबईत प्रचाराचा सुपर संडे, घरोघरी पोहोचण्यासाठी धावपळ: रॅलीसह बैठकांचेही आयोजन
By नामदेव मोरे | Published: May 12, 2024 06:56 PM2024-05-12T18:56:05+5:302024-05-12T18:56:13+5:30
महाविकास आघाडीची सभा, महायुतीची 'मिसळ पे चर्चा'
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीचा शेवटचा रविवार असल्यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरू होती. प्रत्येक विभागात रॅली, बैठकांचे आयोजन केले जात होते. घरोघरी पत्रके वाटण्याचे कामही वेगाने सुरू होते.
नवी मुंबईमध्ये ८ लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. अनेक ठिकाणी पती, पत्नी दोघेही नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात. रविवार वगळता सर्व सदस्य घरामध्ये नसतात. यामुळे निवडणूक काळात रविवारी जास्तीत जास्त घरापर्यंत पोहचण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते प्रयत्न करतात. यावर्षी १२ मे हा प्रचाराचा शेवटचा रविवार असल्यामुळे सकाळपासून दोन्ही प्रमुख उमदेवारांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. प्रत्येक सोसायटी व घरांमध्ये उमेदवाराचा व त्यांच्या कामाचे परिचय पत्रक पोहचविले जात होते. आतापर्यंत केलेली कामे व भविष्यात केलेल्या कामांचा जाहिरनामाही नागरिकांपर्यंत पोहचविता जात होता. शनिवारी सायंकाळी, रविवारी सकाळी व सायंकाळी नवी मुंबईच्यी १११ प्रभागांमध्ये ठिकठिकाणी रॅलीं आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क साधून मतदानाचे आवाहन केले.
महाविकास आघाडीची सभा
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी कोपरखैरणे सेक्टर १५ ते १८ च्या मैदानामध्ये सभेचे आयोजन केले आहे. आमदार शशिकांत शिंदे, संग्राम थोपटे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या परिसरात माथाडी कामगारांची वसाहत असल्यामुळे या सभेचे आयोजन केले होते.
महायुतीची 'मिसळ पे चर्चा'
भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्यावतीने सीवूड येथे मिसळ पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विजय नाहटा, निलेश म्हात्रे, नामदेव भगत, महेश खरे, विजय माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून केलेली कामे व भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
चौकसभांसह बैठका
नेरूळ सेक्टर १८ मध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी चौक सभेचे आयोजन केले होते. सीवूडमध्ये केरळ व दक्षिणेतील राज्यांमधील नागरिकांची बैठक आयोजिली होती. शहरातील विविध विभागांमध्येही चौकसभा आयोजित केल्या होत्या.