नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील पाचही मार्केट सुरळीत सुरू झाली आहेत. फळ मार्केटमध्ये हापूससह कलिंगडची आवक वाढू लागली आहे. आंब्याची निर्यातही सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.मंगळवारी फळ मार्केटमध्ये १८० ट्रक व टेंपोची आवक झाली आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ३० हजार पेट्या हापूस विक्रीसाठी मार्केटमध्ये आला आहे. दक्षिणेकडील राज्यातून बदामी व इतर आंबाही विक्रीसाठी येत आहे.घाऊक मार्केटमध्ये २०० ते ५०० रूपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ४०० ते १ हजार रूपये डझन दराने हापूसची विक्री होत आहे. जवळपास ५० ट्रक व टेंपोमधून कलिंगड विक्रीसाठी आले आहे. रमजान सुरू होणार असल्यामुळे कलिंगडला मागणी वाढण्याची शक्यता आहे.भाजीपाला मार्केटमध्ये २५२ ट्रक व टेंपोची आवक झाली असून ३३२ वाहने मुंबईमध्ये थेट पाठविण्यात आली आहेत. कोबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, टोमॅटोची आवक सर्वाधिक होत आहे. कांदा व बटाटा एपीएमसीच्या बाहेरही मोठ्याप्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे बाजारसमितीमध्ये ग्राहकांची संख्या रोडावली आहे.लिंबू, आल्याला पसंतीकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून लिंबू व आल्याला मागणी वाढली आहे. सध्या आल्याची ५० ते १०० टन प्रतिदिन विक्री होत आहे. २० ते २५ टन लिंबू विकले जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये एक लिंबूचा दर पाच रुपये आहे.
हापूससह कलिंगडची आवक वाढली; एपीएमसीमध्ये ३० हजार पेट्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:46 AM